Mon, Nov 19, 2018 12:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सचिनच्या मुलीला फोनवरून धमकी

सचिनच्या मुलीला फोनवरून धमकी

Published On: Jan 08 2018 1:27AM | Last Updated: Jan 08 2018 12:53AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिच्यासोबत अश्‍लील संभाषण करून धमकी दिल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी देवकुमार मिट्टी या आरोपीस शनिवारी कोलकाता येथून अटक केली. सचिनच्या व्यवस्थापकाने केलेल्या तक्रारीनुसार 354 ड, 507, 509 भादंवी कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

आरोपीला उद्या वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. सारा सध्या विदेशात असल्याने धमकीचे सर्व कॉल सचिनच्या व्यवस्थापकाने घेतल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित ठाकरे यांनी सांगितले. साराला अज्ञात व्यक्तीकडून काही दिवसांपासून धमकी येत होती. आपले सारावर प्रेम असून यात कोणी हस्तक्षेप केल्यास परिणाम वाईट होतील. एक दिवस तिला पळवून नेऊ, अशी आरोपीने धमकी दिली होती. डिसेंबर महिन्यात पहिला कॉल आला. त्यानंतर सलग काही दिवस देवकुमार कॉल करून धमकी देत होता.  जवळपास वीसहून अधिक कॉल त्याने केल्याचे उघडकीस आले आहे. 

वांद्रे पोलिसांच्या एका विशेष पथकाने कोलकाता येथे राहणार्‍या आरोपीला ताब्यात घेऊन रविवारी चौकशीसाठी मुंबईत आणले. देवकुमार हा बेरोजगार असून त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. काहीच कामधंदा न करणार्‍या देवकुमारने साराच्या घरचा क्रमांक मिळवला होता.धमकी देण्यामागील हेतू तपासानंतर समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.