Sat, Jul 20, 2019 12:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईसाठी रेल्वेचे स्वतंत्र महामंडळ उभारा

मुंबईसाठी रेल्वेचे स्वतंत्र महामंडळ उभारा

Published On: Mar 09 2018 2:06AM | Last Updated: Mar 09 2018 1:41AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी आणि निर्णय क्षमता गतिमान करण्यासाठी मुंबई उपनगरीय रेल्वेचे स्वतंत्र महामंडळ उभारण्याची मागणी राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने केली आहे. याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना सचिनने पत्र लिहिले आहे.

उपनगरीय लोकलने प्रवास करणार्‍या 75 लाख मुंबईकरांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. नवी मुंबईत सिडकोने रेल्वे स्थानके उभारली आहेत. या स्थानकांमध्ये उतरल्यास वेगळाच भास निर्माण होतो. तसेच कोकण रेल्वे मुंबई ते मंगळुरू या स्थानकांमधील कामकाज पाहते, त्यामुळे सिडको आणि कोकण रेल्वेच्या धर्तीवर मुंबईतील उपनगरीय सेवेसाठी स्वतंत्र महामंडळ उभारावे, अशी सूचना सचिनने पत्राद्वारे रेल्वे मंत्री गोयल यांना केली आहे. 

उपनगरीय सेवा स्वतंत्र कंपनीच्या हाती दिल्यास कामकाजात वेग येईल. तसेच झटपट निर्णय घेऊन प्रकल्प राबवण्याचा वेळ कमी होईल. त्यामुळे एकप्रकारे भारतीय रेल्वेवरील दडपण काही अंशी कमी होईल, असा दावाही सचिनने केला आहे. मी जो प्रस्ताव ठेवलाय त्याच्या अंमलबजावणीत अडथळे असले, तरी तुम्ही माझ्या मागणीला पाठिंबा द्याल, याची मला खात्री आहे, असे सचिन म्हणाला. रेल्वेच्या संबंधित विभागाला त्याचे पत्र कार्यवाही करण्यासाठी पाठवले असल्याचे रेल्वे मंत्री गोयल यांनी पत्रात म्हटले आहे.

तीन वर्षात 4280.50 कोटींचा तोटा

स मुंबईतील लोकलसेवा सुधारण्यावर केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असताना या लोकलमुळे गेल्या तीन वर्षात 4 हजार कोटींपेक्षा जास्त तोटा झाल्याची माहिती सरकारतर्फे संसदेत देण्यात आली. लोकसभेत यासंदर्भातील लेखी उत्तरात रेल्वे राज्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. 

भारतीय रेल्वेतर्फे मुंबई महानगरात लोकलसेवा चालवण्यात येते. गेल्या तीन वर्षात लोकलच्या माध्यमातून मिळालेले एकूण उत्पन्न हे 5206.16 कोटी रुपयांचे आहे तर तर खर्च 9486.66 कोटी रुपये इतका आला आहे. यामुळे 4280.50 कोटींचा तोटा झाल्याचे मंत्र्यांनी सांगितले.  2018 केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई उपनगरात लोकलचे जाळे विस्तारण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी 11000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील लोकलसाठी अतिरिक्त  40 हजार कोटींची तरतूद करण्याचेही नियोजन आहे.