होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेना उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या एसआरए वादातूनच!

सेना उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या एसआरए वादातूनच!

Published On: May 09 2018 1:56AM | Last Updated: May 09 2018 1:29AM
एसआरए वादातूनच!
मुंबई : प्रतिनिधी
कांदिवलीतील शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन वसंत सावंत यांच्या हत्येचा पंधरा दिवसांत पर्दाफाश करण्यात कुरार पोलिसांना यश आले आहे. या हत्येचा कटातील मुख्य आरोपी, दोन शूटर आणि मदत करणार्‍या चारजणांसह सात आरोपींना मालाड आणि उत्तर प्रदेशातून कुरार पोलिसांनी अटक केली आहे. कांदिवलीतील एसआरएच्या वादातूनच सचिन सावंत यांची प्रतिस्पर्धी गटाने 10 लाखांची सुपारी देऊन ही हत्या घडवल्याचे स्पष्ट झाले असून  शूटरसह इतर आरोपींना दहा लाख रुपयांची सुपारी देतानाच विविध आमिषे दाखविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. 

लोकेश देवेंद्र सिंग, अभय ऊर्फ बारक्या किसन साळुंखे, सत्येंद्र ऊर्फ सोनू रामजी पाल, निलेश रमाशंकर शर्मा, ब्रिजेश ऊर्फ ब्रिजा नथुराम पटेल, ब्रिजेश श्रीप्रकाश सिंह आणि अमीत निरंजन सिंह अशी या सातजणांची नावे आहेत. यातील ब्रिजेश पटेल हा मुख्य आरोपी असून लोकेश आणि अभय हे शूटर असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय राजेशिर्के यांनी सांगितले. या सर्वांना बोरिवलीतील लोकल कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

यातील लोकेश, अभय, सत्येंद्र, निलेश, ब्रिजेश आणि अमीत या सहाजणांना उत्तर प्रदेशातील बदलापूर, चंदौली परिसरातून स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या चौकशीत ब्रिजेश सिंह याचे नाव समोर आले होते. त्याला मालाड येथून पोलिसांनी अटक केली. ब्रिजेश पटेल आणि निलेश शर्मा यांनीच सावंत यांच्या हत्येचा कट रचला होता. त्यासाठी त्यांनी इतर पाचजणांची मदत घेतली. 

सचिन सावंत यांची हत्या करण्यापूर्वी त्यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत सचिन सावंत यांच्या हत्येसाठी दहा लाख रुपयांची सुपारी ठरली होती. त्यापैकी तीन लाख रुपये सुरुवातीला देण्यात आले. उर्वरित सात लाख रुपये हत्येनंतर देण्याचे ठरले. काम फत्ते झाल्यानंतर इतर दोन शूटरसह सहाही आरोपींना विरार आणि नालासोपारा येथे फ्लॅट देण्याचे ठरले होते. कांदिवलीतील एसआरए प्रोजेक्टमध्येही त्यांना काही हिस्सा देऊन आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. 

गेल्या 22 एप्रिल रोजी क्रांतीनगरात शाखेची मिटींग संपल्यानंतर सचिन सावंत सहकारी जगन्नाथ वर्मासोबत बाईकवरुन गोकुळनगरला जात होते.  बाईकवरुन आलेल्या दोन तरुणांनी हाक मारून थांबवले. एक तरुण बाईकवरुन खाली उतरला. त्याने सचिन सावंत यांना मिठी मारतानाच शांतपणे त्यांच्या छातीत एक गोळी झाडली. या हत्येचा तपास अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश प्रधान, पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष वेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय रार्जेशिर्के यांची पथके करीत होती.

Tags : Mumbai, mumbai news, Sachin Sawant, murder, caes,