Thu, Aug 22, 2019 09:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाडेवाढीमुळे पहिल्याच दिवशी वाहक हैराण

भाडेवाढीमुळे पहिल्याच दिवशी वाहक हैराण

Published On: Jun 17 2018 1:43AM | Last Updated: Jun 17 2018 1:43AMमुंबई : रोहिणी साळूंखे

एसटीच्या शुक्रवारी मध्यरात्रीपासून झालेल्या भाडेवाढीचा पहिल्याच दिवशी वाहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. ईटीआयएम मशीन मधील सॉफ्टवेअर अपडेट झाले नसल्याने प्रवाशांना दोन-दोन तिकीटे द्यावी लागत होती.तर काही डेपोंमध्ये ईटीआयएम मशिन अपग्रेडेशनसाठी वेळ लागल्याने गाड्या उशीरा सोडाव्या लागल्या. सुट्टया पैशांची कटकट नको म्हणून पाचच्या पटीत भाडेवाढ करुनही प्रवाशांकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. लोक नोटाच दाखवत तिकीट मागत होते.

एसटी महामंडळाने केलेली नवीन एसटी भाडे वाढ रात्री 12 पासून लागू झाली खरी परंतु मुक्कामी गाड्यांमध्ये असणारे ईटीआयएम मशीन मधील सॉफ्टवेअर अपडेट नसल्याने वाहक व प्रवाशांना परिणामी त्रासाला सामोरे जावे लागले. सुरुवातीला वाहकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. नवीन भाड्याचे तिकीट नेमके कसे द्यायचे,  काय करायचे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर पडला होता.

भाडेवाढीच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात ईटीआयएम मशीन अपडेट करावे लागणार होते. एकतर रात्री उशीरापर्यंत नवीन दर वाढ बर्‍याच डेपोत आली नव्ह्ती. तर काही ठिकाणी व्हर्जन अपडेट साठी लिंक आली नव्हती.रात्रीच्या वेळी मुक्कामी असणार्‍या गाड्यांमधील ईटीआयएम मशीन ज्या आगारातून गाडी सुटली होती त्याच आगारात ते मशीन अपडेट होणार होते. त्यामुळे सोबतच मॅन्युअल ट्रे आधीच वाहकांच्या ताब्यात दिले होते. या गोंधळामुळे ईटीआयएम मशीन मधून जुने तिकीट आणि फरकाचे वेगळे मॅन्युअल तिकीट असे दोन तिकीट प्रवाशांना द्यावे लागत होते.

तिकीट प्रणाली व्यवस्थेत आवश्यक ते बदल न झाल्याने हा गोंधळ झाला. यामुळे काही आगारातून एसटी बस तास-दोन तास उशीरा सुट्ल्या. प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. तोट्यातून सावरण्यासाठी भाडे वाढीचा केलेला आटापिटा मात्र काही ठिकाणी एसटी महामंडळाचीच पहिल्या दिवशी डोके दुखी ठरला. मागील भाडे वाढीवेळी मशीन व्यवस्थित अपडेट झालेने काही अडचणी आल्या नव्ह्त्या. परंतु यावेळी नेमके याच्या उलटे झाले. याऊलट शिवनेरी व शिवशाही बसच्या बुकिंग केलेल्या प्रवाशांनी फरकाच्या तिकीटावरुन कोणताही वाद न घालता ज्यादाची रक्कम वाहकांना दिली.