Wed, Mar 20, 2019 08:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तोटा कमी करण्यासाठी एसटी उतरणार मालवाहतुकीत

तोटा कमी करण्यासाठी एसटी उतरणार मालवाहतुकीत

Published On: Sep 02 2018 1:53AM | Last Updated: Sep 02 2018 1:34AMठाणे : अनुपमा गुंडे

गेली काही वर्षे सातत्याने तोट्याचा सामना करणार्‍या राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाने संचित तोट्यांतून बाहेर पडण्यासाठी मालवाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. एसटीकडे असलेले राज्यातील वितरण व्यवस्थेचे जाळे, जागा आणि एसटीच्या प्रवाशांसाठी वापरात नसलेल्या बसेस यांचा वापर करून ही मालवाहतूक सुरू करण्यासाठी महामंडळाच्या वतीने प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. 

प्रवाशांनी एसटीकडे आकर्षित व्हावे, यासाठी एसटी गेल्या काही वर्षात वातानुकुलित सेवा देणार्‍या शिवशाही, शिवनेरी यासारख्या सेवा सुरू केल्या. एसटीचा कारभार आधिक गतिमान व्हावा, यासाठी महामंडळाचे प्रयत्न सुरू असले तरी राज्याच्या काही भागात प्रवासी भारमानात घट होते आहे, त्यातच डिझेलच्या वाढत्या किंमती, टोल, सामाजिक अस्थिरतेच्या काळात एसटीची होणारी तोडफोड, संप याचाही महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होतो आहे. या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी, संचित तोटा भरून काढण्यासाठी मालवाहतूक व्यवसायात उतरण्यासाठी महामंडळाने गेल्या वर्षभर तयारी सुरू केली आहे. 

मालवाहतूकीसाठी आवश्यक असणारे वेअर हाऊस उभे करण्यासाठी आवश्यक असलेल्या मोठ्या - मोठ्या जागा राज्याच्या विविध भागात आगारे आणि बसस्थानकाच्या माध्यमातून महामंडळाच्या ताब्यात आहेत. त्याचबरोबर महामंडळाकडे असणार्‍या जुन्या बसेस, ज्यांच्या वापर प्रवासी वाहतुकीसाठी केला जात नाही, अशा बसेस ट्रकच्या आकारात रूपांतर करून त्या या व्यवसायासाठी वापरण्याचा महामंडळाचा मानस आहे. मालवाहतूकीसाठी लागणार्‍या जागा आणि ट्रक  हे दोन्ही मोठे भांडवली खर्च आणि मनुष्यबळ  या  जमेची बाज आहेत. मालवाहतूक सुरू झाली तरी ती प्रत्यक्ष महामंडळाने चालावयाची की त्यासाठी बाह्य यंत्रणेची गरज घ्यायची, याबाबत महामंडळाचा विचार सुरू आहे. 

यासंदर्भात अलीकडेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री दिवाकर रावते व महामंडळाच्या आधिकार्‍यांनी मालवाहतुकीची कल्पना मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. मुख्यमंत्र्यांनी या कल्पनेला हिरवा कंदील दाखविला असून महामंडळाने याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्याचे आश्‍वासनही दिले आहे. मात्र, महामंडळाने मालवाहतुकीची सेवा जम बसेपर्यंत बाजार भावापेक्षा कमी  दरात उपलब्ध करून द्यावी, अशीही सूचना केली.  मुख्यमंत्र्यांच्या या आश्‍वासनामुळे महामंडळाने या विषयावर जोमाने काम सुरू केले असून मालवाहतुकीच्या प्रस्तावावर काम करण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती विश्‍वसनीय सुत्रांनी दिली.