Fri, Apr 26, 2019 03:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एसटी कर्मचार्‍यांचा वेतन करार होणार 1 मे रोजी

एसटी कर्मचार्‍यांचा वेतन करार होणार 1 मे रोजी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

एस. टी. कर्मचार्‍यांच्या वेतन करारासाठी आता कामगार दिनाचा मुहूर्त  काढण्यात आला आहे. एस. टी. तील सुमारे 1 लाख कामगार कर्मचार्‍यांना वेतन करार हा येत्या दि. 1 मे रोजी करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. या करारासाठी कर्मचार्‍यांनी चार दिवसांचा संप  केला होता; तसेच पुन्हा संपाचे हत्यार उपसण्याचा ईषारा दिला होता.  दरम्यान वाटाघाटीला तयार असुन वेतनवाढ देण्याच्या बैठकीत सहभागी होऊन उभयमान्य तोडग्याला  तयार असल्याचे कामगार संघटनां प्रतिनिधीनी सांगितले. 

सोमवारी एस. टी. च्या मुख्यालयात वेतन करारा संदर्भात कामगार संघटना प्रतिनिधींची बैठक रावते यांनी बोलविली होती.कोणकोणत्या कारणांनी कामगार वेतन करार रखडला त्याची चर्चा न करता  मान्यताप्राप्त संघटनांनी सकारात्मक भुमिकेतुन चर्चा करावी असे आवाहन रावते यांनी केले. 

जर ही चर्चा निष्फळ ठरली तर आपण स्वत: येत्या दि. 1 मे रोजी सर्व कामगारांना मान्य  होईल असा  सन्मानजनक वेतन करार जाहीर करू असे सांगुन रावते यांनी या करारात सध्या कार्यरत असलेल्या सुमारे 60 हजार कनिष्ठ वेतनश्रेणात असलेल्या कामगारांचे वेतन वाढविण्याच्य दृष्टीने तरतूद करण्यात येणार असल्याचेही जाहीर केले. कामगार नेतृत्वाने वेतन वाढीबाबत असलेली संभ्रमावस्था दूर करावी असेही ते म्हणाले. 2016 ते 2020 या कालावधीसाठी असलेला हा वेतन करार हा ऐतिहासिक व सन्मानजनक व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कामगार संघटनेची बाजू मांडताना हनुमंत ताटे म्हणाले की, पुर्वी 1 हजार 76 कोटी  रूपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र नंतर समितीने 741 कोटी रूपयांचा नवा प्रस्ताव तयार केला आहे. एस. टी. मध्ये 60 ते 65 हजार कामगार हे अत्यंत कमी  पगारावर काम करत आहेत. त्यांना अन्य परिवहन उपक्रमांप्रमाणे वेतन मिळण्याची मागणी केली आहे. त्यासाठी सध्या असलेला पगारात 3 हजार 500 रूपयांची वाढ करून त्याला गुणीले 2. 57 अशी वाढ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. वेतनवाढीची थांबलेली  चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. उभयमान्य तोडगा निघावा यासाठी वाटाघाटीत आपण सहभागी झाल्याचेही ताटे म्हणाले. यावेळी एस. टी. चे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह तसेच आमदार भाई जगताप , संदीप शिंदे, दिलीप साटम हेही उपस्थीत होते.


  •