Sun, Mar 24, 2019 10:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एसटी वाहकपदाच्या चाचणीतील पात्र महिला भरती प्रक्रियेतून बाद

एसटी वाहकपदाच्या चाचणीतील पात्र महिला भरती प्रक्रियेतून बाद

Published On: May 17 2018 2:21AM | Last Updated: May 17 2018 2:11AMठाणे : अनुपमा गुंडे

महामंडळाच्या चालक तथा वाहक भरतीत 200 पैकी 40 महिला वाहन चाचणी परीक्षेतही पात्र ठरल्या होत्या. मात्र, या 40 महिलांमधील 15 ते  20  महिलांकडे अवजड वाहतुकीचा परवाना नाही, त्यामुळे या महिला भरती प्रक्रियेतून बाद झाल्या आहेत. तर ज्यांच्याकडे अवजड वाहतुकीचे परवाने होते, त्यांच्या परवान्याला 3 वर्षे पूर्ण न झाल्याने त्या अपात्र ठरल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली असून त्यामुळे महामंडळात महिलांना प्राधान्य देण्याचे परिवहन खात्याचे आश्‍वासन महिलांसाठी गाजरच ठरल्याचे समोर आले आहे.  

अवजड वाहतुकीचा परवाना (हेवी लायसन) नसल्याने यंदा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या सेवेत रूजू होण्याचे महिला चालकांचे स्वप्न भंगले आहे. आदिवासी भागातील महिलांना रोजगारांची संधी म्हणून एस टी भरतीची योजना जाहीर केली असली तरी या योजनेच्या अंमलबजावणीस ऑगस्टमध्ये प्रारंभ होणार आहे. त्यानंतर 26 आदिवासी महिला दीड ते 2 वर्षांनंतर महिलावाहक म्हणून रूजू होतील. मात्र, त्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

एसटी महामंडळात 7 हजार 929 चालक तथा वाहक पदे भरतीच्या प्रक्रियेस 2017 मध्ये प्रारंभ झाला. या पदासाठी 28 हजार 314 उमेदवारांचे अर्ज आले. या अर्जात  445 महिलांच्या समावेश होता. या सर्व उमेदवारांची 2 जुलै 2017 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. 445 महिला उमेदवारांपैकी 200 महिला लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. तर लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची वाहन चाचणी भोसरी येथे घेण्यात आली. 

चालक तथा वाहक अशी महामंडळाने जाहिरात केली असली तरी चालक होण्यासाठी आवश्यक असलेल्या पात्रता गृहीत धरल्या जातात. चालक पदासाठी दहावी उत्तीर्ण तसेच अवजड वाहतुकीच्या 3 वर्षांच्या अनुभवाची अट आहे. महामंडळाच्या चालक तथा वाहक भरतीत 200 पैकी 40 महिला वाहन चाचणी परीक्षेतही पात्र ठरल्या. मात्र, या 40 महिलांमधील 15 ते  20  महिलांकडे अवजड वाहतुकीचा परवाना नाही, त्यामुळे या महिला भरती प्रक्रियेतून बाद झाल्या. तर ज्यांच्याकडे अवजड वाहतुकीचे परवाने होते, त्यांच्या परवान्याला 3 वर्षे पूर्ण न झाल्याने त्या अपात्र ठरल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

अलीकडेच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आदिवासी स्त्री - पुरुषांना रोजगाराची संधी देण्याच्या हेतूने एसटीच्या सेवेत चालक म्हणून रूजू होण्यासाठी पुढाकार घेतला.  यासाठी ज्या आदिवासी स्त्री - पुरुषांचे शिक्षण 10 वी उत्तीर्ण आहे, अशांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देऊन नंतर त्याचा वाहन परवाना काढायचा, त्यांना वाहन प्रशिक्षण दिल्यानंतर अवजड वाहतुकीचा परवाना देऊन महामंडळाच्या सेवेत रूजू करण्याची घोषणा केली. यासाठी आदिवासी विकास विभाग या महिला-पुरुष उमेदवारांना साडेचार हजार रुपये स्टायपेंड देणार आहे. या योजनेंतर्गत विदर्भातील यवतमाळ येथील 26 महिलांची निवड करण्यात आली असून या महिलांचे  वाहन प्रशिक्षण ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे. 

हे प्रशिक्षण पूर्ण होण्यास दीड ते 2 वर्षांच्या कालावधी लागेल. या महिलांचे निवासी प्रशिक्षण पांढरकवडा, गडचिरोली आणि शहादा येथे होणार आहे. त्यामुळे पुढील भरती प्रक्रियेत तरी महिलांच्या हाती एसटी सारथ्य करण्याची संधी हुकली आहे.