Fri, Apr 26, 2019 20:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एसटी उभारणार राज्यात ३ हजार शौचालये

एसटी उभारणार राज्यात ३ हजार शौचालये

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : चंदन शिरवाळे

संत गाडगेबाबा यांच्या नावाने स्वच्छ अभियान सुरु केल्यानंतर एसटीने आता प्रवासी व नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी सुमारे तीन हजार बस थांब्यालगत (प्रवासी शेड) शौचालये बांधण्याचा संकल्प केला आहे. या खर्चाचा एसटीवर भार पडणार नाही. शौचालये बांधणार्‍यालाच थांब्यालगत लहानशा कॅन्टीनसाठी जागा दिली जाणार असून त्यापोटी शौचालयाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबधीतांवर सोपविण्यात येणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सुमारे अठरा हजार बस आहेत. त्यामधुन दररोज किमान 65 लाख प्रवासी प्रवास करतात. महिला प्रवाशांची संख्या अधिक असताना त्यांच्यासाठी पुरेशी शौचालये नाहीत. मोठ्या बस थांब्यालगत शौचालयांची सुविधा असली तरी आपली गाडी सुटेल या भितीने ग्रामीण महिला प्रवासी बसमधुन खाली उतरत नाहीत. प्रवास संपेपर्यंत त्यांना प्रतिक्षा करावी लागते. 

महिला प्रवाशांची कुचंबना लक्षात घेऊन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी बसशेडलगत शौचालये उभारण्याचा संकल्प केला आहे. शौचालय बांधणार्‍याला कॅन्टीनसाठी जागा दिली जाईल. तेथे चहा किंवा अल्पोपहार विक्रीतुन त्याला रोजगार उपलब्ध होईल. जागेसाठी भाडे न घेता शौचालयांची दुरुस्ती व देखभाल करण्याची जबाबदारी कॅन्टीन चालविणार्‍यावर सोपविण्यात येईल, अशी माहिती रावते यांनी दै. ‘पुढारी’ला दिली. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी झुणका भाकर केंद्रांच्या माध्यमातुन रोजगार उपलब्ध केला होता. याच संकल्पनेतुन शौचालयांच्या माध्यमातुन रोजगार व त्यामधुन सेवा देण्याचा संकल्प असल्याचे रावते यांनी स्पष्ट केले.

एसटीचे काही प्रवासी थांबे सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या रस्त्यांवर आहेत. सध्या या विभागासोबत चर्चा सुरु असल्याची माहिती एका अधिकार्‍याने दिली. सध्या कर्नाटक सरकारने राज्य रस्त्यांवर अशा प्रकारची शौचालये बांधली आहेत. आपल्या राज्यात टोलनाके वगळता रस्ते व महामार्गांवर शौचालये नाहीत. 

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीने आता आपल्या प्रवासी शेडलगत शौचालये बांधण्याचा संकल्प केला आहे. शौचालयांचा आराखडा तयार आहे. या शेडमध्येच प्रवासी तिकीट आरक्षण केंद्र सुरु करण्याचा विचार असून याबाबत लवकरच निविदा काढल्या जाणार असल्याची माहितीही या अधिकार्‍याने दिली.