Sat, Jul 20, 2019 03:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'परिवहन मंत्र्यांनी ST कर्मचाऱ्यांची फसवणूक केली'

'परिवहन मंत्र्यांनी ST कर्मचाऱ्यांची फसवणूक केली'

Published On: Jun 08 2018 10:54AM | Last Updated: Jun 08 2018 10:54AMमहाड प्रतिनिधी  

महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नामदार दिवाकर रावते यांनी कामगारां संदर्भात केलेल्या वेतनवाढीच्या फसव्या घोषणेविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील दृष्टी कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण  झाला असून राज्यात सर्वत्र आज एसटी गाड्या बंद असल्याचे दृष्य पहावयास मिळत आहे. राज्यातील या बंदचा परिणाम महाड आगारांमध्ये दिसून येत असून सकाळपासून केवळ पाच गाड्या सोडण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक श्री अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे. बंदची कोणतीही अधिकृत माहिती कामगार संघटनांच्या वतीने देण्यात आले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

राज्याचे परिवहन मंत्री नामदार दिवाकर रावते यांनी एसटी कामगारांच्या करिता घोषित केलेली कोट्यवधी रुपयांची वेतनवाढ ही केवळ कागदावर असून याबाबत त्यांनी लेखी पत्राने कामगार संघटनांशी चर्चा करून ही घोषणा प्रत्यक्षात अंमलात आणावी, अशी मागणी महाडमधील कामगारांच्या वतीने करण्यात आली आहे. कामगारांसंदर्भात रावते यांनी केलेली घोषणा ही केवळ फसवणूक असून याविरोधात शासनाने त्वरित कार्यवाही करून कामगारांच्या न्याय मागण्या मंजूर कराव्यात अशी आग्रही मागणी महाड आगारातील एसटी कामगारांकडून करण्यात आली आहे. 

 महाड आगारात सध्या तीनशे पन्नास एसटी कर्मचारी कार्यरत असून यापैकी बहुतांश कर्मचारी आज संपावर गेल्याचे दृश्य प्रत्यक्ष भेटीअंती निदर्शनास आले आहे . यासंदर्भात कामगारांशी केलेल्या चर्चेप्रसंगी सकाळी सुटणाऱ्या सदतीस गाड्यांपैकी केवळ पाच गाड्या सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले असून रात्रीच्या सोडण्यात येणाऱ्या गाड्या या आगारामध्ये परत आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मुंबई पुणे ठाणे नालासोपारा व कोकणात मिळून जाणाऱ्या सुमारे तीनशे पन्नास फेऱ्यांची नोंद महाड आगारांमध्ये दैनंदिन स्वरूपात केली जाते. या गाड्यांपैकी बहुतांश गाड्या आज या मार्गावर धावल्या नसल्याची माहितीही देण्यात आली आहे.

 सकाळी मुंबईला जाणाऱ्या पाच गाड्या पैकी केवळ एक गाडी गेल्याची माहिती आगार व्यवस्थापनातून देण्यात आली असून यानंतर सकाळी नऊ वाजेपर्यंत सत्तावीस गाड्यांच्या फेऱ्या  रद्द झाल्याची माहिती देण्यात आली असून या दरम्यान एसटी आगारात आलेल्या विविध ठिकाणच्या प्रवाशांचे हाल होत असल्याचे निदर्शनास आले आहे . शासनाने आमच्या मागण्यांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची व केवळ कागदावरील घोषणा प्रत्यक्षात देण्याची मागणी कामगारांकडून करण्यात आली असून ते त्वरित न झाल्यास एसटी कामगारांचे आंदोलन अधिक चिघळण्याची भीती कामगार वर्गातून व्यक्त होत आहे.

- एसटी महामंडळाने जाहीर केलेल्या नव्या वेतन करारातील तरतुदींविषयी नाराजी असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यातील काही आगारांमध्ये 'काम बंद' आंदोलन सुरु केले आहे._

-अधिक माहितीनुसार, हा कुठल्याही अधिकृत संघटनेने पुकारलेला संप नसून कर्मचाऱ्यांनी तो उत्स्फुर्तपणे पुकारला आहे. भंडारा, सांगली, औरंगाबाद, मुंबई, पुणे येथे मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर गेले आहेत. मात्र अचानक काम बंद केल्याने सुट्टीवरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे.