Wed, Apr 24, 2019 07:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अधिकृत चाळींच्या पहिल्या मजल्यांना एसआरए!

अधिकृत चाळींच्या पहिल्या मजल्यांना एसआरए!

Published On: Feb 15 2018 2:29AM | Last Updated: Feb 15 2018 2:10AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

मुंबईतील अधिकृत चाळींमध्ये वर्षानुवर्षे रहाणार्‍या पहिल्या मजल्यावरील रहिवाशांनाही एसआरए योजनेत सामावून घेतले जाण्याचे संकेत आहेत. यासंदर्भात गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी एसआरए प्राधिकरणाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.  कुर्ला, बोरिवली, कांदिवली, मालाड, दहिसर, वरळी, घाटकोपर, विक्रोळी, जोगेश्वरी, गोरेगाव, अंधेरी आदी परिसरातील सुमारे 16 ते 17 हजार चाळकर्‍यांना त्याचा लाभ होणार आहे. 

मुंबईतील अधिकृत चाळींच्या भोवती झोपड्या उभ्या रहात गेल्या. या चाळींमध्ये 1995 पूर्वीपासून महिल्या मजल्यावर देखील रहिवासी रहात आहेत. झोपडपट्ट्यांसाठी एसआरए योजना लागू करताना या अधिकृत चाळींचाही समावेश झाला. मात्र, एसआरए योजनेत पहिल्या व पोटमाळ्यांवरील रहिवाशांना लाभ देण्यात येत नसल्याने या पहिल्या मजल्यावरील रहिवाशांना समाविष्ट करण्यात येत नसल्याने या रहिवाशांवर अन्याय झाला होता. डोळ्यादेखत शेजारी अनधिकृत झोपड्या उभ्या राहिल्या असताना त्यातील रहिवाशांना एसआरएची घरे दिली जातअसताना अधिकृत चाळीत राहूनही घरे मिळत नसल्याने या रहिवाशांकडून सातत्याने योजनेत सामावून घेण्याची मागणी होत होती.

खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार योगेश सागर यांनी या मुद्यावर प्रकाश मेहता यांची भेट घेतली. त्यावेळी मेहता यांनी 1995 पूर्वीपासून अधिकृत चाळीतील पहिल्या मजल्यावर रहाणार्‍या रहिवाशांनाही एसआरए योजनेत सामावून घेण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले.  दरम्यान झोपडपट्टयांमध्ये देखील पोटमाळे आणि पहिला मजला तयार करण्यात आला आहे. या रहिवाशांनाही काही अटींवर एसआरए योजनेत सामावून घेण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. असे पोटमाळे आणि पहिल्या मजल्यावर रहाणार्‍या रहिवाशांना पंतप्रधान आवास योजनेचे लाभ देऊन योजनेत सामावून घेण्याबाबत विचार आहे. त्यासंदर्भात केंद्राला प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली.