Tue, Mar 26, 2019 20:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विश्वास पाटलांची सीआयडी घेणार ‘झाडाझडती’

विश्वास पाटलांची सीआयडी घेणार ‘झाडाझडती’

Published On: Mar 14 2018 1:47AM | Last Updated: Mar 14 2018 1:47AMमुंबई : खास प्रतिनिधी

मुंबईतील एसआरए घोटाळा प्रकरणातील निवृत्त सनदी अधिकारी आणि लेखक विश्वास पाटील यांच्या चौकशीसाठी नेमल्या गेलेल्या समितीचा अहवालच गायब झाल्याची धक्कादायक माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानसभेत दिली. पाटील यांच्या गैरव्यवहारांची  सीआयडीकडून चौकशी करण्याची घोषणा त्यांनी केली. विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारवर प्रश्‍नांचा भडिमार केला. 

एसआरए प्रकरणात निवृत्तीच्या काही दिवस आधी विश्वास पाटील यांनी 137 फाईल्सना तातडीने मंजुरी दिली होती. त्यापैकी 33 फायली संशयास्पदरीत्या मंजूर केल्याचा आरोप पाटील यांच्यावर आहे. मंगळवारी विधानसभेत प्रश्‍नोत्तरांच्या तासात हा विषय आला होता. 

शशिकांत शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, सुनील प्रभू, राजेश टोपे आदींनी सरकारवर प्रश्‍नांचा भडिमार केला. त्यावर पाटील यांनी 33 फायलींना मंजुरी देताना दाखवलेली तत्परता संशयास्पद असून त्याच्या चौकशीसाठी वरिष्ठ सनदी अधिकारी सीताराम कुंटे यांची समिती नेमण्यात आली होती. कुंटे यांनी आपला अहवाल सादर केला, मात्र त्याची फाईलच गायब झाली असल्याचे राज्यमंत्री वायकर  यांनी सांगितले. फाईल गहाळ झाल्याप्रकरणी निर्मल नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहितीही वायकर यांनी दिली. 

काय आहे एसआरए घोटाळा प्रकरण ?

उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी असताना पाटील यांनी त्यांची पत्नी चांद्रसेना यांना एका झोपु योजनेतील विकासकाच्या कंपनीत भागीदार बनविले. या भागीदारीच्या मोबदल्यात पाटील यांनी पत्नीच्या नावे जुहूसारख्या आलिशान ठिकाणी 1661.68 चौरस फूट आणि 1119.56 चौरस फुटाच्या, 925.79 चौरस फुटाच्या टेरेसह दोन सदनिका आणि चार पार्किंगच्या जागांचा लाभ मिळवला. समुद्रकिनारी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या सदनिकांची बाजारभावातील किंमत कोटयवधी रुपयांच्या घरात आहे.

पाटील यांच्यावर एसआरए प्रकरणी अनेक गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांच्दया चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीताराम कुंटे यांची चौकशी समिती नेमली. या समितीने पाटील यांच्यावरील आरोपात तथ्य असल्याचा निष्कर्ष काढणारा अहवाल दिल्यानंतर सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले होते.