होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मिनिमम बॅलेन्सची SBI ची अट रद्द?

मिनिमम बॅलेन्सची SBI ची अट रद्द?

Published On: Jan 05 2018 3:47PM | Last Updated: Jan 05 2018 3:47PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

देशतील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI च्या खात्यात मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची मर्यादा कमी होण्याची शक्यता आहे. सरकारच्या दबाबवामुळे खात्यावर कमीत कमी शिल्लक रक्कम ठेवण्याच्या मर्यादेत कपात केली जाऊ शकते. सध्या बँक खात्यात ३ हजार रुपये मिनिमम बॅलेन्स ठेवणे बंधनकारक आहे. ती रक्कम १ हजार रुपयांपर्यंत कमी केली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 

बँकांकडून खात्यावर किमान रक्कम ठेवण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये ३ हजार, लहान शहरांमध्ये २ हजार तर ग्रामीण भागात १ हजार रुपयांची मर्यादा आहे. बँकेकडून खात्यावर महिन्याला सरासरी शिल्लक आणि सहा महिन्यांसाठी शिल्लक रकमेच्या नियमांमध्येही बदल केले जाण्याची शक्यता आहे. बँकेच्या अहवालानूसार एप्रिल ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत खात्यावर किमान शिल्लक नसल्याचे कारणाने १,७७२ कोटी रुपयांचा दंड जमा झाला आहे. 

खात्यातील किमान रक्कमेच्या मर्यादेबाबत बँकेकडून अद्याप अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेने अशा प्रकारच्या निर्णयाचा काय परिणाम होऊ शकतो याची तपासणी केली होती. त्यामुळे SBI कडून खात्यावरील किमान रक्कमेसंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.

सार्वजनिक बँकांच्या तुलनेत SBI मध्ये खात्यावर किमान शिल्लक ३ हजार रुपये हे जास्तीच आहे. अन्य सार्वजनिक बँकांमध्ये किमान शिल्लक एक हजार इतकी ठेवावी लागते. तर, देशातील मोठ्या ५ खाजगी बँकांमध्ये खात्यावर किमान शिल्लक रक्कमेची मर्यादा १० हजार रुपये इतकी आहे. त्यामध्ये आयसीसीआय, एचडीएफसी, कोटक, अॅक्सिस या बँकांचा समावेश आहे.