Sun, May 19, 2019 23:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एस.टी. उपाहारगृहांचे कंत्राट आता महिला बचत गटांना

एस.टी. उपाहारगृहांचे कंत्राट आता महिला बचत गटांना

Published On: Jan 29 2018 1:29AM | Last Updated: Jan 28 2018 11:58PMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांमधील सर्वच उपाहारगृहे चालविण्याचे कंत्राट यापुढे केवळ महिला बचत गटांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

एस.टी.च्या प्रवाशांकरिता विविध बसस्थानकांमध्ये उपाहारगृहे आहेत. स्थानिक व्यावसायिक निविदा भरून ही उपाहारगृहे कंत्राटी तत्त्वावर चालविण्यास घेतात. काही दिवसांपूर्वी परिवहन महामंडळाने 58 उपाहारगृहांसाठी निविदा मागविल्या होत्या; पण व्यावसायिकांनी एकमेकांशी संगनमत केल्यामुळे केवळ पाच उपाहारगृहांच्या निविदांना प्रतिसाद मिळाला होता. परंतु, त्यातील एकाही निविदेस अपेक्षित रकमेपेक्षा जादा देकार मिळाला नाही. त्यामुळे महामंडळाचे होणारे आर्थिक नुकसान आणि प्रवाशांची गैरसोय पाहून महामंडळाने आपल्या धोरणात बदल केला आहे. सध्या सुरू असलेल्या उपाहारगृहांचे करार संपल्यानंतर त्या ठिकाणी नव्याने निविदा मागविताना महिला बचत गटांनाच उपाहारगृहे द्यावीत, असे आदेश पारित करण्यात आले आहेत.

महिला बचत गटाने उपाहारगृहासाठी निविदा भरली असल्यास व अटी-शर्ती पूर्ण केल्यास सदरील उपाहारगृह त्यांना चालविण्यास देण्यात येईल. उपाहारगृहाचे तीन महिन्यातून एकदा पेस्ट कंट्रोल, शिळे पदार्थ विक्रीला बंदी, हात धुण्याची व पिण्याचे पाण्यासाठी स्वतंत्र जागा, खाद्यपदार्थ बनविण्याकरिता आयएसओ प्रमाणित तेल, कर्मचार्‍यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी, उपाहारगृह कर्मचार्‍याचे हात, खाण्याचे पदार्थ अथवा पिण्याच्या पाण्याला स्पर्श करणार नाही, याची काळजी घेण्याच्या अटी महिला बचत गटांवर टाकण्यात आल्या आहेत.