Wed, Apr 24, 2019 12:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एस.टी. कर्मचार्‍यांसाठी आता ‘ना काम, ना दाम’

एस.टी. कर्मचार्‍यांसाठी आता ‘ना काम, ना दाम’

Published On: Apr 19 2018 1:35AM | Last Updated: Apr 19 2018 1:22AMमुंबई : प्रतिनिधी

एस. टी. महामंडळामध्ये जे कर्मचारी वेळेत कामावर येत नाहीत आणि वेळेआधीच घरी जातात, त्यांचे रेकॉर्ड ठेवण्यात येणार असून, कामावर दहा मिनिटे जरी उशिरा पोहोचले, तरी त्या दिवसाची रजा लावण्यात येणार आहे.

कर्मचार्‍यांचा तीनवेळा लेटमार्क लागल्यास त्याची एक दिवसाची नैमित्तिक रजा कापण्यात येणार आहे. ज्या कर्मचार्‍यांच्या खात्यामध्ये नैमित्तिक रजा शिल्लक नसेल, त्यांची अर्जित रजा कापण्यात येणार आहे. ज्या कर्मचार्‍यांवर वारंवार अशी कारवाई केली जाईल, त्याच्यावर शिस्तभंग आणि अपील कार्यपद्धतीनुसारदेखील कारवाई केली जाणार आहे. तसेच पूर्वसंमतीशिवाय आणि रजा मंजूर न करता गैरहजर राहिल्यासही कारवाई करण्यात येणार असल्याचे महामंडळाच्या परिपत्रकामध्ये म्हटले आहे.

महामंडळामधील कर्मचारी वर्ग-3 साठी स. 9.45 ते सायं. 5.30 आणि वर्ग-4 साठी स. 9.30 ते सायं. 6 वा. अशी कार्यालयीन वेळ आहे. वर्ग-3 मधील कर्मचार्‍यांना स. 9.50 आणि वर्ग-4 मधील कर्मचार्‍यांना स. 9.35 वाजता हजेरीपत्रक बंद करण्यात येणार आहे. तसेच वर्ग-3 साठी स. 9.55 आणि वर्ग-4 कर्मचारी स. 9.45 पर्यंत ‘लेटमार्क हजेरीपटा’वर सही करू शकतात. वर्ग-3 चे स. 9.55 आणि वर्ग-4 कर्मचारी स. 9.45 पर्यत हजेरीपटावर सही करू शकतात. परंतु, त्यानंतर येणार्‍या कर्मचार्‍यांना हजेरीपटावर सही करण्याची परवानगी असणार नाही. त्यामुळे त्या कर्मचार्‍यांची त्या दिवशी रजा गृहीत धरण्यात येणार आहे. 

वेळेआधीच घरी जाणार्‍या कर्मचार्‍यांचा छडा लावण्यासाठी सायंकाळी 5.30 वाजता कर्मचार्‍यांची पुन्हा हजेरीपत्रकावर सही घेण्यात येणार आहे. तर उशिरा येणार्‍या कर्मचार्‍यांना ‘ना काम ना दाम’ तत्त्वानुसार तेवढ्या वेळेचे वेतन कापण्यात येणार आहे.