Mon, Sep 24, 2018 17:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अफवांच्या ‘जीवघेण्या’ साथीची पोलीस महासंचालकांकडून दखल

अफवांच्या ‘जीवघेण्या’ साथीची पोलीस महासंचालकांकडून दखल

Published On: Jul 03 2018 1:53AM | Last Updated: Jul 03 2018 1:43AMमुंबई : प्रतिनिधी

मूले पळविणारी टोळी असल्याच्या पसरलेल्या अफवेतून एका जमावाने बेदम मारहाण करुन पाच जणांची निर्घुण हत्या केल्याच्या घटनेची नवनियुक्त पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यातील सर्व पोलीस अधिकार्‍यांना सतर्कतेच्या सूचना देत, नागरिकांमध्ये जागृती निर्माण करावी. अशा अफवांमध्ये शहानीशा करुन नागरिकांना योग्य परिस्थीतीशी अवगत करण्याचे आदेश त्यांनी बजावले आहेत. तर नागरिकांनाही शांतता राखण्याचे आवाहन पडसलगीकर यांनी केले आहे.

पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी सोमवारी एक पत्रक काढत, समाजातील काही समाज कंटक अफवा पसरवून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करुन निष्पाप नागरिकांना मारहाण करतात. तसेच काही वेळेस त्यांना जीवे ठार मारले जाते. अशा अफवांवर विश्‍वास न ठेवता त्वरीत स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा. जेणेकरुन पोलीस शहानीशा करुन उचीत कायदेशीर कारवाई करतील. नागरिकांनीही अशा अफवांवर विश्‍वास ठेऊन कोणत्याही प्रकारची आक्रमक कृती किंवा मारहाण करु नये. केवळ क्षणिक भावनेच्या आहारी जाऊन असे कृत्य केल्यास हत्या किंवा हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे नमूद केले आहे.

पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर राज्यातील आयुक्तालये आणि जिल्हा पोलीस प्रशसनाच्या प्रमुखांनीही सोशल मिडीया, प्रसिद्धी माध्यमांच्या आधारे नागरीकांना अफवांवर विश्‍वास न ठेवता, शांतता राखून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली आहे.