Fri, Jul 19, 2019 14:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकप्रतिनिधींनी दबाव आणू नये यासाठी नियम करावेत

लोकप्रतिनिधींनी दबाव आणू नये यासाठी नियम करावेत

Published On: Jul 21 2018 1:31AM | Last Updated: Jul 21 2018 1:15AMमुंबई : 

जनतेच्या कामासाठी सरकारी कार्यालयांत येणार्‍या लोकप्रतिनिधींचा अधिकार्‍यांनी सन्मान हा राखलाच पाहिजे. लोकप्रतिनिधींनीही एखाद्या सरकारी अधिकार्‍याशी वागताना कोणतेही नियमबाह्य काम करण्यासाठी दबाव आणू नये, यासाठी नियम तयार करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

लोकप्रतिनिधींकडून सरकारी अधिकारी-कर्मचार्‍यांना होणारी मारहाण, दमबाजी, तसेच सरकारी कर्मचार्‍यांवर समाजातील विविध व्यक्‍तींकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी अधिकार्‍यांना कायदेशीर संरक्षण देणारा कायदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत अलीकडेच करण्यात आला. त्यास राष्ट्रपती व केंद्र सरकारची मंजुरी घेऊन भारतीय दंडसंहिता कलम 332, 353 च्या तरतुदींमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. अधिकार्‍यांच्या मनमानीला अंकुश लावण्याचे कारण सांगून सरकारी अधिकार्‍यांना संरक्षण देणार्‍या कलमांबाबत फेरविचार करण्याची चर्चा सुरू झाली आहे. तसे झाल्यास ते खूपच अन्यायकारक होईल, असे अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.