Thu, Nov 15, 2018 20:39



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी ४२५ कोटींची तरतूद

नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी ४२५ कोटींची तरतूद

Published On: Feb 08 2018 7:04PM | Last Updated: Feb 08 2018 7:03PM



बीड : प्रतिनिधी

नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात ४२५ कोटी रूपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. या मार्गावरून २०१९ पर्यंत रेल्वे धावण्याचे जिल्हा वासियांचे स्वप्न पूर्ण होणार असून, त्यादृष्टीने रेल्वेचे काम सध्या वेगाने सुरू आहे.  

नुकत्याच सादर झालेल्या रेल्वे  अर्थसंकल्पात राज्यातील २५ रेल्वे प्रकल्पांसाठी २४४६ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात नगर-बीड-परळी मार्गाला ४२५ कोटी रूपये मिळाले आहेत. अर्थसंकल्पापूर्वी पालकमंत्री ना. पंकजा मुंडे आणि खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांची मुंबईत भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली होती. 

वेगाने काम सुरू
या निधीमुळे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी पाहिलेले बीडच्या रेल्वेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. २६१ किमी लांबीच्या या रेल्वेमार्गासाठी २८०० कोटी रूपये लागणार असून, केंद्र व राज्य सरकार  संयुक्तपणे याचा खर्च उचलत आहे. सध्या या मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. मार्च २०१७ मध्ये नगर ते नारायणडोह या साडेबारा किमी दरम्यान कामाची चाचणी करण्यासाठी सात डब्यांची रेल्वेही धावली होती. आता कामाचा वेग पाहता लोणी (ता. आष्टी) पर्यंत रूळ अंथरण्याचे काम पूर्ण झाले असून, बीड पर्यंत १२० किमी रेल्वे लिकिंग म्हणजे रूळ अंथरण्याची सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यंदा मार्च अखेर सोलापूरवाडी पर्यंत रेल्वे धावण्याची शक्यता आहे. या रेल्वे मार्गावर सध्या सुरू असलेल्या कामाचा वेग पाहता २०१९ मध्ये रेल्वे धावण्याचे जिल्हा वासियांचे स्वप्न निश्चित पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. 
राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी केलेला सततचा पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळेच अर्थसंकल्‍पात ही तरतूद करण्यात आल्‍याच्या भावना नागरिकांमध्ये आहेत.