Thu, Dec 13, 2018 23:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पंजाब नॅशनल बँकेत 11 हजार 500 कोटींचा घोटाळा

पंजाब नॅशनल बँकेत 11 हजार 500 कोटींचा घोटाळा

Published On: Feb 15 2018 2:14AM | Last Updated: Feb 15 2018 2:08AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रिच कॅण्डी शाखेत तब्बल 11 हजार 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. ठराविक खातेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात बेकायदा व्यवहार झाल्याचे बँकेच्या लक्षात आले आणि त्यानंतर हा घोटाळा उघड झाला.

या घोटाळ्यामुळे बँकेचा शेअर 10 टक्क्यांनी कोसळला. यासंबंधी बँकेने मुंबई स्टॉक एक्स्चेंजकडे तक्रार नोंदवली आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात पंजाब नॅशनल बँकेसह इतर 12 बँकांनी एक अब्ज डॉलर्सच्या विदेशी चलन व्यवहाराचे उल्‍लंघन केल्यामुळे त्यांना दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतरचा हा दुसरा घोटाळा आहे.

या घोटाळ्याचा बँकेच्या एकूण व्यवहारावर काय परिणाम होईल, हे सांगण्यास तपास यंत्रणांनी नकार दिला. तसे केल्यास इतर बँकांची बदनामी होऊन त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असे सांगण्यात आले. याबाबत बोलताना एका बँकिंग तज्ज्ञाने सांगितले की, या व्यवहारासंबंधी आताच काही स्पष्टपणे सांगता येणार नाही. बँकांमध्ये काही तारण असेल, तर ही रक्‍कम वसूल होऊ शकेल.

याआधीही घोटाळा

याआधीही पंजाब नॅशनल बँकेत काही अनियमित व्यवहार झाले होते. त्यामध्ये देशातील श्रीमंत गणल्या गेलेल्या निरव मोदी या सराफाची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी 282 कोटींचा घोटाळा समोर आला होता; पण आताच्या घोटाळ्याची व्याप्ती फारच मोठी असल्याने हे प्रकरण गंभीर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 2017 मध्ये बँकेला 1 हजार 320 कोटींचा नफा झाला होता. हा घोटाळा या नफ्याच्या आठपट आहे.