उल्हासनगर : वार्ताहर
चित्रपटात अभिनेत्रीचा रोल देतो, असे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर 8 महिने अत्याचार करणार्या भामट्या निर्मात्याला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे. मेहबुबअली खान (39, रा. मालाड-मुंबई) असे या निर्मात्याचे नाव आहे. मेहबुबअली याने विविध अभिनेते, अभिनेत्रींसोबत असलेल्या फोटोचा एक गु्रप तयार केला. त्यात काही मुलींना त्याने अॅड केले. त्यात उल्हासनगरमधील एका अल्पवयीन मुलीचाही समावेश होता. मेहबुबअली याने त्या मुलीशी संपर्क साधून मी निर्माता आणि दिग्दर्शक आहे, तुला चित्रपटामध्ये अभिनेत्रीचा रोल देतो, असे अमिष दाखवले. त्यानंतर त्याने डिसेंबर 2017 ते जुलै 2018 पर्यंतच्या कालावधीत त्या मुलीला ठाणे, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
दरम्यान, ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पालकांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आल्यावर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास जोमाने सुरू केला. स्वत:ला निर्माता आणि दिग्दर्शक समजणार्या मेहबुबअली खान याने या मुलीला मालाड येथे ठेवले असल्याची माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याचे व. पो. नि. पालवे यांना मिळाली. त्या माहितीवरून स. पो. नि. प्रीतम चौधरी व त्यांच्या टीममधील बागुल, वाघ, मालती कांबळे यांनी मालाड परिसरातून मेहबुबअली याला ताब्यात घेऊन त्याच्या तावडीतून या मुलीची सुटका केली. त्याच्याविरुद्ध उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हाजर केले असता 16 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.