Tue, Jun 25, 2019 13:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केईएम रूग्णालयात होणार रोबोटिक शस्त्रक्रिया

केईएम रूग्णालयात होणार रोबोटिक शस्त्रक्रिया

Published On: Aug 15 2018 11:59PM | Last Updated: Aug 15 2018 11:05PMमुंबई : प्रतिनिधी    

खासगी  रुग्णालयात उपलब्ध असणारी रोबोटिक शस्त्रक्रिया आता लवकरच पालिकेच्या रुग्णालयातही उपलब्ध होणार आहे. पालिकेच्या केईएम, सायन आणि नायर या महत्त्वाच्या रुग्णालयांपैकी प्रमुख असलेल्या केईएम रुग्णालयात आता हा रोबोट शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल झाला. सध्या या रोबोटची ट्रायल बेसवर चाचणी केली जात आहे. सर्वात अवघड असणार्‍या शस्त्रक्रिया या रोबोटच्या साहाय्याने केल्या जाणार आहेत.    

सध्या अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी रोबोटचा खासगी रुग्णालयात वापर केला जात आहे.  महापालिकेच्या केईएम रुग्णालयात लवकरच रोबोटद्वारे अशा शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. रोबोटने  शस्त्रक्रिया कशी करायची  यासाठी पालिकेच्या केईएम, सायन आणि नायर या पालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना सध्या प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांच्या कामाच्या वेळेनुसार डॉक्टरांना टप्प्या टप्प्याने केईएममध्ये प्रशिक्षण दिले जात आहे. या रोबोटची किंमत वीस कोरडच्या आसपास  आहे. त्यामुळे केईएम, सायन आणि नायर या तिन्ही पालिकेच्या रुग्णालयांसाठी एकच मशीन सध्या खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती तिन्ही पालिका रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे 
यांनी दिली.

कोणत्या शस्त्रक्रियेसाठी होणार वापर?

रोबोटिक शस्त्रक्रियेचा कॅन्सर, लिव्हर सर्जरी अशा मोठ्या शस्त्रक्रिये साठी वापर होणार आहे. त्यामुळे ही मशीन पालिकेच्या प्रत्येक रुग्णालयात असेल तर त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात रुग्णांना होईल यात काही शंका नाही. शिवाय, सर्वच रुग्णांना या शस्त्रक्रियेचा वापर होत नाही. त्यामुळे तिची देखरेख ठेवणे ही सोपे जाईल असे डॉ. सुपे यांनी स्पष्ट केले.

या प्रस्तावावर सध्या मुंबई महापालिकेत चर्चा सुरू आहे. या रोबोटिक शस्त्रक्रियेच्या प्रस्तावावर गेल्या वेळेसही चर्चा झाली होती. पण, मशिन्स महाग असल्याकारणाने हा प्रस्ताव मार्गी लागला नाही. पण, आता 2018 मध्ये या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येईल. हा रोबोट सध्या केईएम रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. त्याचे प्रशिक्षण सध्या डॉक्टरांना दिले जात आहे. स्थायी समितीत हा प्रस्ताव असल्याकारणाने त्यावर अजून शिक्कामोर्तब झालेला नाही.

- डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

हा रोबोट 11 तारखेलाच रुग्णालयात आणला गेला आहे. सध्या हा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त आय.ए. कुंदन यांच्याकडे आहे. त्यांनी निर्णय दिल्यानंतर या मशीनचे काम सुरू होईल. सध्या इन्स्टॉलेशनचे काम सुरू आहे. या रोबोटमुळे अनेक अवघड शस्त्रक्रिया करणे सोपे होईल. रोबोटचा सर्व कंट्रोल हा डॉक्टरांच्याच हातात असणार आहे. तर एका स्क्रिनवर सर्वच डॉक्टर्स शस्त्रक्रिया बघू शकणार आहेत.

- डॉ. सुजाता पटवर्धन, विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती प्रमुख.