Thu, Mar 21, 2019 23:22
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रोबो सोफिया मुंबईच्या भेटीला

रोबो सोफिया मुंबईच्या भेटीला

Published On: Dec 27 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 1:06AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

सौदी अरेबियाचे नागरिकत्व मिळालेली पहिली रोबो सोफिया मुंबई आयआयटीच्या टेकफेस्ट या वार्षिक महोत्सवात 30 डिसेंबर रोजी सहभागी होणार आहे. तिला प्रश्‍न विचारण्याची संधी मुंबई आयआयटीकडून ट्विटर वापरणार्‍यांना दिली जाणार आहे. इलेक्ट्रीक कार मेकर टेस्ला सीईओ एलन मस्क यांच्यासह सोफिया संभाषणात सहभागी होणार आहे. या उपक्रमात सहभाग घेण्याची संधी मोजक्या लोकांना दिली जाणार आहे. 

आम्ही ट्विटरवर एक प्रचार मोहीम सुरु करीत आहोत. या माध्यमातून सोफियाला प्रश्‍न विचारण्याची संधी ट्विटर वापरणार्‍यांना दिली जाईल. यासाठी आस्क सोफिया हा हॅशटॅग सुरु करण्यात आला आहे. ट्वीटरवरुन विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांचा संच केला जाणार असून, ते प्रश्‍न सोफियाला विचारले जाणार आहेत, अशी माहिती टेकफेस्टचे मीडिया आणि मार्केटिंगचे व्यवस्थापक अनिरुद्ध पोदार यांनी दिली. 2014 साली टेकफेस्टनमध्ये बिना 48 सोशल रोबो सहभागी झाला होता. आणि त्याच्याशी संवाद साधण्याची संधी देण्यात आली होती. 

रोबोटिक्स आणि आर्टिफिशिअल इंटिलिजन्सचा वापर करुन सोफियाची निर्मिती करण्यात आली आहे. डॉ. डेव्हीड हॅन्सन आणि त्यांच्या पथकाने हाँगकाँग येथील हॅन्सन रोबोटिक्समध्ये सोफियाची निर्मिती केली होती. ऑक्टोबरमध्ये सौदी अरेबियाने सोफियाला नागरिकत्त्व दिले होते.

30 डिसेंबरचा संपूर्ण दिवस सोफिया मुंबई विद्यापीठाच्या आवारात राहणार आहे. गेल्या उन्हाळ्यात आम्ही या अत्याधुनिक रोबोच्या निर्मितीबाबत ऐकत होतो, तिला निमंत्रित करण्याचे तेव्हाच निश्‍चित झाले होते, असे पोदार म्हणाले. 

29 ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार्‍या या टेकफेस्टमध्ये 14 वर्षांचा तन्मय बक्षी सहभागी होणार आहे. तो आयबीएमचा सर्वात तरुण डेव्हलपर आहे. त्याच्याशिवाय आधार प्राधिकरणाचे अध्यक्ष जे सत्यनारायण, औषधशास्त्रात नोबेल प्राप्‍त रँडी चेकमॅनदेखील या महोत्सवात सहभागी होणार आहेत.