Fri, Jul 19, 2019 05:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घोटाळेबाज कंत्राटदारांच्या पत्नी, कुटुंबीयांना रस्त्यांची कामे

घोटाळेबाज कंत्राटदारांच्या पत्नी, कुटुंबीयांना रस्त्यांची कामे

Published On: Apr 08 2018 2:13AM | Last Updated: Apr 08 2018 1:19AMमुंबई : प्रतिनिधी 

रस्त्यांच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप करत, काहींनी आपण भ्रष्टाचारी विरोधी असल्याचे चित्र उभे केले. पण प्रत्यक्षात वेगळच असून आजही घोटाळेबाज कंत्राटदारांच्या पत्नी व कुटुंबातील सदस्यांना रस्त्यांची कामे देण्यात येत असल्याचा आरोप करत, शनिवारी स्थायी समितीत भाजपाने शिवसेनेला टोला लगावला. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपातील वाद चव्हाट्यावर येणार आहेत.

रस्ते घोटाळ्याच्या चौकशीची मागणी दोन वर्षापूर्वी तत्कालिन महापौर स्नेहल आंबेकर यांनी केली होती. त्यानंतर पालिका आयुक्तांनी चौकशी करून दोषी कंत्राटदारांसह अधिकार्‍यांवर कारवाई केली. याचे श्रेय पालिका निवडणूकीत शिवसेनेने घेतले होते. पण प्रत्यक्षात रस्ते व नालेसफाई घोटाळ्याची चौकशी करण्यास  भाजपाने आयुक्तांना भाग पाडले होते. रस्ते व नालेसफाईच्या घोटाळ्याबद्दल आवाज उठवणारी शिवसेना घोटाळेबाजांच्या कुटूंबालाच पुन्हा कंत्राट देत असल्याकडे शनिवारी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी लक्ष वेधले. काहींनी आपण भ्रष्टाचारविरोधी असल्याचे चित्र उभे केले. अभियंत्यावर पालिका आयुक्तांनी कारवाई केली. मग कंत्राटदारांना तोच न्याय का नाही. मी बनविन ते धोरण आणि मी बांधीन ते तोरण.. असे चालवून घेतले जाणार नाही. अधिकार्‍यांना शिक्षा होत असताना, दोषी कंत्राटदारांच्या पत्नी व कुटुंबातील अन्य सदस्यांना नव्या कंपनीच्या नावाने करोडो रुपयाची रस्त्याची कामे दिली जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. यावर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी रस्ते घोटाळ्यातील 150 अधिकार्‍यांवर कारवाई झाली, मग कंत्राटदारांवर कारवाई का नाही, असा सवाल केला.    

Tags : mumbai, mumbai news, scam contractor, wife and family, Road work,