Sun, May 26, 2019 10:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोल्डमिक्स नव्हे, झोलमिक्स !

कोल्डमिक्स नव्हे, झोलमिक्स !

Published On: Jul 19 2018 1:38AM | Last Updated: Jul 19 2018 1:29AMमुंबई : प्रतिनिधी 

रस्त्यावरील खड्ड्यांवरून बुधवारी स्थायी समिती सदस्यांनी पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. खड्डे बुजवण्यासाठी रस्ते विभाग वापरत असलेले कोल्डमिक्स नसून ते झोलमिक्स असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. खड्ड्यांची आकडेवारी सांगणे थांबवा अशी मागणी करत,  मुंबईकरांची किती दिवस थट्टा करणार, असा संतप्त सवाल यावेळी सदस्यांनी केला.  

मुंबईतील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास पालिका प्रशासन असमर्थ ठरल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी दै. पुढारीतमध्ये छापलेले फोटो प्रशासनाला दाखवत, मुंबईकरांची किती दिवस थट्टा करणार असा सवाल केला. राजा यांचा हा मुद्दा शिवसेनेसह भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व सपाच्या सदस्यांनी उचलून धरला. शिवसेनेचे संजय घाडी यांनी खड्डे बुजवण्यासाठी मुंबईकरांचे पैसे वाया घालवायचे का, असा सवाल केला. खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणारे कोल्डमिक्स मटेरियल कुचकामी ठरले आहे. दरवर्षी हॉटमिक्सचा वापर करून खड्डे बुजवले जात असतील तर, यावेळी कोल्डमिक्सचा आग्रह का, असा सवालही भाजपाचे गटनेता मनोज कोटक यांनी केला. खड्डे बुजवण्यासाठी मुबलक कोल्डमिक्स मटेरियल असल्याचे प्रशासन सांगते. मग अनेक ठिकाणी पेवर ब्लॉकने खड्डे बुजवण्यात का येत आहेत. पेवरब्लॉकने बुजवलेले खड्ड्याच्या जागी पुन्हा खड्डे पडले आहे. याला जबाबदार कोण, असा सवालही यावेळी सर्व पक्षीय सदस्यांनी केला. 

शिवसेनेच्या मंगेश सातमकर यांनी सायन विभागातील रस्त्यावर खड्डेच नाहीत, कारण तेथे रस्तेच शिल्लक राहिले नसल्याचा टोला प्रशासनाला लगावला. कोल्डमिक्सच्या नावाखाली प्रशासनाने चुना लावण्याचे काम केले आहे. 
पालिकेने गेल्या 48 तासात बुजवलेल्या खड्ड्यांची माहिती जाहिर करावी, अशी मागणी सपाच्या रईस शेख यांनी केली. अखेर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी तातडीने खड्डे बुजवून मुंबईकरांना दिलासा द्या, असे आदेश प्रशासनाला दिले. यावर अतिरिक्त आयुक्त विजय सिंगल यांनी कोल्डमिक्स मेटेरियल खड्डे बुजवण्यासाठी उत्तम असल्याचे प्रमाणपत्र दिले.