Thu, Apr 25, 2019 16:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रियाजच्या मारेकर्‍यांना कोठडी

रियाजच्या मारेकर्‍यांना कोठडी

Published On: Dec 18 2017 2:38AM | Last Updated: Dec 18 2017 12:38AM

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

प्रस्तावित हुक्का पार्लरमध्ये येणार्‍या गाड्यांना मज्जाव करणार्‍या रियाज ऊर्फ मेंटल शब्बीर अहमद शेख (33) याच्या दोघा मारेकर्‍यांच्या मुसक्या टिळकनगर पोलिसांनी अवघ्या दोन तासात आवळल्या आहेत. साजिद हमीद सय्यद (30, रा. दातवालीची चाळ) आणि इरफान ऊर्फ छोटू जमालूद्दीन शेख (22, रा. मलिक चाळ) अशी त्यांची नावे असून, त्यांना कल्याणच्या सुट्टीकालीन कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी तिघांचा सहभाग असून, त्यांना शोधण्यासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. घटनास्थळी सापडलेल्या एका जिवंत काडतुसामुळे याठिकाणी गोळीबार झाला की नाही, याबाबत डॉक्टरांसह पोलीसही संभ्रमात आहेत. 

दोघेही हल्लेखोर कल्याण पूर्वेतील श्रीकृष्ण नगरमध्ये राहणारे आहेत. साजिद सय्यद हा रिक्षा चालवितो. तर इरफान पीओपीचे काम करतो. रियाज राहत असलेल्या कचोरे गाव (नवीन गोविंदवाडी) येथील शर्मा चाळीच्या समोर साजिद हुक्का पार्लर सुरू करणार होता. रियाजचा त्याला विरोध होता.  

रियाजची पत्नी निलोफर (30) ही पतीच्या हत्याकांडाची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. घटनास्थळाजवळ घराच्या गॅलरीत उभी असताना घरी परतणार्‍या रियाज याला शाहरूख रफीक बंगाली, जिवादादा आणि पापा पठाण या दोघांनी जखडून ठेवले. साजिद आणि इरफान यांनी त्याच्यावर सशस्त्र हल्ला चढविला. साजिद याने कट्ट्याने रियाजवर गोळ्या झाडल्याचा आरोप निलोफरने केला आहे. 

रियाज कुख्यात गुन्हेगार

हल्ल्यात ठार झालेला रियाज शेख हा मेंटल नावानेही ओळखला जायचा. त्याच्या नावावर कल्याणचे बाजारपेठ पोलीस ठाणे, उल्हासनगरचे हिललाईन पोलीस ठाणे, कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. तो सध्या जामिनावर होता. हल्ल्याच्या वेळी त्यानेही शस्त्र बाळगले असल्याची जबानी आरोपींनी दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीराव धुमाळ यांनी दिली.

गोळीबाराच्या शक्यतेची तपासणी

मारेकर्‍यांनी गोळीबार केल्याचा आरोप रियाजच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र रियाजच्या शरीरात गोळी घुसल्याचा डॉक्टरांनी इन्कार केला. मात्र गोळी कपाळाला घासून गेल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला. त्यामुळे त्याचा तपास जे. जे. हॉस्पिटलच्या तज्ज्ञांकडून करण्यात येणार आहे.