Mon, May 27, 2019 01:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘रिव्हर मार्च’ चित्रफितीवरून राजकीय तडतडबाजे

‘रिव्हर मार्च’ चित्रफितीवरून राजकीय तडतडबाजे

Published On: Mar 04 2018 2:10AM | Last Updated: Mar 04 2018 12:36AMमुंबई : प्रतिनिधी

मुख्यमंत्री, अर्थमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि प्रशासनातील अव्वल दर्जाचे अधिकारी यांचा सहभाग असलेली रिव्हर मार्चची ध्वनिचित्रफीत अवघ्या काही मिनिटांची असली तरी त्यावरून काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपा यांच्यातील तडतडबाजे आठवडाभर सुरूच आहेत. ध्वनिचित्रफितीतील सहभागप्रकरणी शासकीय अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करा, अशी मागणी काँग्रेसने केली असली तरी मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकार्‍यांची ठाम पाठराखण करण्यात आली आहे. हा सामाजिक उपक्रम असून त्यात सहभागासाठी पूर्वपरवानगीची कोणतीही आवश्यकता नाही, असा दावा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आला आहे. 

रिव्हर मार्चकडून दिखावा केला जात आहे. ध्वनिचित्रफीतीत पालिका आयुक्त व मुंबई पोलीस आयुक्त तसेच अन्य अधिकार्‍यांचा सहभाग नागरी सेवा नियमांचे उल्लंघन करणारा असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. चित्रीकरणात वर्षा निवासस्थानाचा वापर करण्यात आला आहे. याबाबत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रश्‍न उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे. 4 रोजी होणार्‍या कार्यक्रमाच्या ऑनलाईन तिकीट विक्रीकडे लक्ष वेधत व्यावसायिक कार्यक्रमात अधिकारी कसे सहभागी होतात, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. 

रिव्हर मार्च नोंदणीकृत आहे का? या संस्थेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षित वनक्षेत्रात कशी परवानगी देण्यात आली? व्यावसायिक कंपनीच्या ध्वनिचित्रफीतीत मुख्यमंत्री, अर्थमंत्री व शासनाचे अधिकारी कसे सहभागी होऊ शकतात, असे प्रश्‍न उपस्थित करण्यात आले.