Thu, Apr 25, 2019 11:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रायगडवरील फोटोवरून रितेश देशमुखचा माफीनामा

रायगडवरील फोटोवरून रितेश देशमुखचा माफीनामा

Published On: Jul 06 2018 12:32PM | Last Updated: Jul 06 2018 1:13PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेता रितेश देशमुखने रायगडावरील मेघडंबरीत बसून काढलेले फोटो सोशल मीडियावर टाकले होते. या प्रकारामुळे सोशल मीडियावरुन रितेशवर टीकेची झोड उठली. यानंतर रितेशने माफीनामा सादर केला असून आपला कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्‍हता असे म्‍हटले आहे. 

या प्रकरणावर रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी तीव्र नाराजी दर्शवली आहे. तसेच प्राधिकरणच्या बैठकीत याबाबत नियमावली तयार करणार असल्याचेही त्यांनी म्‍हटले आहे. 

वाचा : ...म्‍हणून रितेश देशमुख रायगडावर?

काय म्‍हणाले संभाजीराजे छत्रपती?

आज सकाळ पासून सोशल मिडीयावर काही सेलिब्रिटींचे रायगडावरील सिंहासनाच्या चौथऱ्यावर बसून महाराजांच्या मुर्तीकडे पाठ करुन काढलेले फोटो प्रसिद्ध झाले आहेत. या प्रकारचे कृत्य समाजात जबाबदार समजल्या जाणाऱ्या लोकांच्या कडून व्हावे हे खरोखरच निंदनीय आहे.

राजसदरेसारख्या पवित्र ठिकाणचे महत्व राखण्यासाठी आज होणाऱ्या रायगड विकास प्राधिकरणाच्या बैठकीत खास नियमावली तयार करण्यात येणार असून त्यातील नियम सर्वांना बंधनकारक असतील.

रितेश देशमुखचा माफीनामा

आपल्या सर्वांचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वापासून प्रेरणा घेण्यासाठी नुकताच रायगड किल्ल्यावर जाण्याचा योग आला. सर्व शिवभक्तांप्रमाणे मी ही इथल्या वातावरणाने भारावून गेलो होतो. त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांच्या पुतळ्याला हार घालून वंदन केलं. आजन्म ज्यांच्या पायावर डोकं ठेवलं त्यांच्या पायापाशी कृतज्ञ होऊन बसण्याची इच्छा अनेक वर्षांपासून होती.

तिथे बसून आम्ही काही छायाचित्रे घेतली आणि ती सोशल माध्यमातून पोस्ट केली. यामागे फक्त भक्तिभाव होता. ती छायाचित्र घेताना किंवा तिथे बसताना आमच्या मनात कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र आमच्या या कृत्यामुळे कोणीही दुखावलं असेल तर त्याची आम्ही अंतःकरणपूर्वक माफी मागतो, असा माफीनामा रितेशने सोशल मीडियावरून दिला आहे.

काय आहे प्रकरण?

अभिनेता रितेश देशमुख, दिग्‍दर्शक रवी जाधव, पानिपतकार विश्वास पाटील आणि सहकारी ५ जुलै रोजी रायगडावर गेले होते. याठिकाणी त्यांनी राजदरबारातील शिवाजी महाराजांच्या शेजारी मेघडंबरीत बसून फोटोसेशन केले. ते फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. 

रितेशसह रवी जाधव आणि विश्वास पाटलांचे हे कृत्य सोशल मीडियावरील अनेकांना आवडले नाही. यावरून त्यांच्यावर चौफेर टीका सुरू झाली. काहींनी तर रितेश आणि इतरांना शिव्यांची लाखोली वाहिली. यानंतर रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष खासदार संभाजी छत्रपती यांनीही हे कृत्य निंदणीय ठरवत नाराजी व्यक्‍त केली. त्यामुळे रितेश देशमुखने सोशल मीडियावरून माफी मागत कुणालाही दुखवायचा हेतू नसल्याचे म्‍हटले आहे.