होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रालयातील उंदीर घोटाळ्यामुळे खळबळ

मंत्रालयातील उंदीर घोटाळ्यामुळे खळबळ

Published On: Mar 23 2018 2:07AM | Last Updated: Mar 23 2018 7:53AMमुंबई : खास प्रतिनिधी 

सरकारला सळो की पळो करून सोडणार्‍या एकनाथ खडसेंनी आज आणखी एक बाँब टाकला. मंत्रालयात उंदरांचे साम्राज्य असल्याचे दाखवून देताना एका संस्थेने एकाच आठवड्यात  तब्बल 3 लाख 19 हजार 400  उंदीर मारल्याची माहिती देत हा सामान्य प्रशासन विभागातील मोठा घोटाळा असल्याचा आरोप खडसेंनी केला आणि त्याची चौकशी करण्याची मागणी केली. हे उंदीर मारण्याचेच विष घेऊनच धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. खडसेंच्या या आरोपाने गुरुवारी विधानसभेत एकच धमाल खळबळ उडवून दिली.

माहितीच्या अधिकारांतर्गत मिळवलेल्या माहितीनुसार आज खडसेंनी सभागृहात प्रश्‍नांची सरबत्ती केली. मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाला असून ते मारण्याचे कंत्राट दिलेल्या संस्थेने केवळ एका आठवड्यात  3 लाख 19 हजार 400 उंदीर मारल्याचे खडसेंनी सांगितले, आणि एकच हलकल्लोळ उडाला. मुंबई महापालिकेला सहा लाख उंदीर मारण्यासाठी दोन वर्षे लागतात, मग अवघ्या सात दिवसांत या संस्थेने 3 लाख 90 हजार उंदीर मारण्याची किमया कशी केली? असा सवाल करीत उंदीर मारण्याचे हे विष घेऊनच धर्मा पाटलांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले. खडसेंनी दिलेल्या या माहितीने एकच खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या सामान्य प्रशासन विभागावरच हल्ला करून हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप खडसेंनी केला. या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. उंदीर मारण्याचे काम सुरू असतानाच्या काळातच मंत्रालयात आलेल्या धर्मा पाटील यांच्या हाती हे विष लागले आणि त्यांनी आत्महत्या केली, असे खडसे यांनी सांगताच सभागृह अवाक झाले. हे विष बाळगण्यासाठी लागणारी कोणतीही परवानगी या संस्थेने सामान्य प्रशासन किंवा गृह विभागाकडून घेतलेली नाही. तसेच विष हाताळण्याचा परवानाही या संस्थेकडे नव्हता, असे सांगत महापालिकेला दोन वर्षांत जे साधले नाही, ते सात दिवसांत या संस्थेला कसे जमले? त्यापेक्षा  मंत्रालयात 10 मांजरी सोडल्या असत्या तरी झाले असते, अशी ढोेपरखळी त्यांनी मारली.

एकट्या मंत्रालयात जर तीन लाख 19 हजार 400 उंदीर असतील तर राज्य सरकारच्या राज्यभरातील सरकारी, निमसरकारी कार्यालये आणि महामंडळांत किती उंदीर असतील असा सवाल उपस्थित करत या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली. हे प्रकरण गंभीर असून अशा प्रकरणांमुळेच सरकार बदनाम झाले असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान या पुर्ण गैरव्यवहाराची चौकशी करुन माहीती सभागृहाला सादर केली जाईल असे आश्वासन सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी सतत काही ना काही आरोप करीत राहणार्‍या खडसेंनी आज हा नवीन आरोप करून खळबळ उडवून दिली. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यावर आपण दिलेल्या हक्कभंगाच्या सूचनेवर वर्ष झाले, तरी अजून काहीही निर्णय न झाल्याने आपल्यालाही बोलायची संधी मिळाली पाहीजे अशी विनंती ही त्यांनी गुरुवारी सकाळीच विधानसभा अध्यक्षांना केली होती.

Tags : Mumbai, Mumbai news, Ministry, Riot Scam,