Thu, Jun 27, 2019 14:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिक्षाचालकाने प्रवाशाला भोसकले

रिक्षाचालकाने प्रवाशाला भोसकले

Published On: Apr 21 2018 1:19AM | Last Updated: Apr 21 2018 1:05AMअंबरनाथ : प्रतिनिधी 

पंधरा दिवसांपूर्वी अंबरनाथ येथील एका प्रामाणिक रिक्षाचालकाला रिक्षा युनियनच्या गुंडांकडून झालेल्या बेदम मारहाणीची घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री एका रिक्षा प्रवाशाला भाडे वादातून रिक्षा चालकांनी चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरिराम असे हल्ला झालेल्या प्रवाशाचे नाव असून, त्यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिक्षा चालकांच्या वाढत्या गुंडगिरीने प्रवाशांत घबराटीचे वतावरण निर्माण झाले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार दयाराम पासवान, हरिराम आणि महेश हे तीन प्रवासी बुधवारी रात्री आनंदनगर एमआयडीसी परिसरात प्रवास करत होते. एमआयडीसी येथून इच्छितस्थळी पोहोचल्यावर ठरल्याप्रमाणे 60 रुपये रिक्षा भाडे देण्यासाठी त्यांनी आपल्या जवळील 100 रुपयांची नोट रिक्षाचालक चंद्रकांत सोनवणे यांच्याकडे दिली. मात्र रिक्षा चालकाने उर्वरित 40 रुपये परत देण्यास नकार दिला. यावरून प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यात वाद सुरू झाला. याचवेळी अन्य रिक्षा चालक संतोष आणि दीपक कुमार पाल हे या ठिकाणी पोहोचले आणि हा वाद विकोपाला गेला.

यावेळी संतोष कुमार या रिक्षाचालकाने हरिराम या प्रवाशाच्या छातीमध्ये चाकूने भोसकले. गंभीर अवस्थेत असलेल्या हरिराम याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. दुखापत गंभीर असल्याने हरिराम यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या ते अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. 

याप्रकरणी गुरुवार, 19 एप्रिल रोजी अंबरनाथ येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात भादंवि 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी चंद्रकांत सोनवणे, संतोष आणि दीपक कुमार पाल यांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

Tags : Mumbai, Rickshaw driver, knife Attack, Mumbai news,