होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिक्षा- टॅक्सीच्या भाड्यांमध्ये २ रुपयांची वाढ होणार?

रिक्षा- टॅक्सीच्या भाड्यांमध्ये २ रुपयांची वाढ होणार?

Published On: Jun 23 2018 1:21AM | Last Updated: Jun 23 2018 1:17AMमुंबई : प्रतिनिधी

पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये झालेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसलेला असतानाच आता मुंबईतील सर्वसामान्यांचे हक्काचे वाहतुकीचे साधन असलेल्या टॅक्सी व रिक्षाच्या भाड्यात देखील वाढ होणार आहे. रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या मागणीनुसार भाड्यामध्ये 2 रूपयांची वाढ करण्यात येणाार असल्याचे समजते. गेल्या 3 वर्षांपासून ऑटो आणि टॅक्सी संघटना भाडेवाढीची मागणी करत होत्या. त्यांच्या या मागणीला महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने हिरवा कंदील दिला आहे.

याआधी भाडेवाढ ही इंधनाच्या दरवाढीवर अवलंबून असायची. आता भांडवली किंमत, दरवर्षी देखभाल आणि दुरुस्ती खर्च, ओव्हरहेड खर्च, विमा, कर इतरही बाबींचा यात समावेश असणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यांमध्ये 2 रूपयांची वाढ होणार असल्याने आता रिक्षाचे किमान भाडे 18 रूपयावरून 20 रूपये तर काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे किमान भाडे 22 रूपयांवरून 24 रूपये होणार आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही मात्र महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाची लवकरच याबाबत बैठक होणार असून त्यात दरवाढीचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.