Tue, Jun 25, 2019 13:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिक्षांना स्कूलबसचा परवाना कसा?

रिक्षांना स्कूलबसचा परवाना कसा?

Published On: Aug 10 2018 1:38AM | Last Updated: Aug 10 2018 1:29AMमुंबई : प्रतिनिधी 

शालेय बसला कमीतकमी 13 आसनाचे बंधन असताना 3 आसनी रिक्षांना विद्यार्थ्यांची ने-आण करण्याची परवानगी कशी दिली जाते, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित करून राज्य सरकारला गुरुवारी चांगलेच धारेवर धरले. 

तीन असानी रिक्षांमध्ये तब्बल आठ ते दहा विद्यार्थ्यांना बसविले जाते. विद्यार्थी रिक्षांमध्ये अक्षरश: लटकत असतात. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. त्यांचा जीव धोक्यात घातला जात आहे, असे स्पष्ट करून नियमात दुरुस्ती करा, अन्यथा आम्ही आदेश देतो, असे खडेबोल न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला सुनावलेे.
स्कूलबसबाबतच्या नियमांत बदल करून परिवहन विभागाने 19 मे रोजी एका आदेशाद्वारे रिक्षा आणि 12पेक्षा कमी आसनी वाहनांनाही स्कूलबस म्हणून वापरण्यास परवाना दिल्याचेच परिपत्रक अ‍ॅड. रमा सुब्रम्हण्यम यांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने सरकारला आणि परिवहन विभागाच्या सहसचिवांना चांगलेच घारेवर धरले. 

न्यायालयाने वारंवार शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्कूलबसबाबतच्या नियमांचे पालन करण्याचे आदेश आहेत. असे असताना रिक्षांना परवाना देण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून त्यात दुरुस्ती कशी काय केली जाते. स्कूलबसला 13 आसनांचे बंधन असताना त्यात नियमात दुरुस्ती करून 3 आसनी रिक्षांना परवानगी दिलीच कशी जाऊ शकते,असा सवाल केला. याबाबत सरकारी वकील अ‍ॅड. अभिनंदन वग्यांनी यांनी बाजू मांडताना ग्रामीण भागात स्कूलबसचा वापर करणे कठीण असल्याने काही पालक आपल्या मुलांना ने-आण करण्यासाठी रिक्षांचा वापर करता. म्हणून रिक्षा परवाना देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट  केले. न्यायालयाचे या उत्तराने समाधान झाले नाही. राज्य सरकारला या प्रकरणी धारेवर धरत याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.

स्कूलबससाठी कमीत कमी 13 आसनांचे बंधन असताना 3 आसनी रिक्षांना परवाना कसा दिला जातो?  ही स्कूलबसच्या नियमांची पायमल्ली आहे. मुलांच्या सुरक्षेचा विचार करूनच शालेय बसच्या नियमांचे उल्लंघन करून मुलांची सुरक्षा धोक्यात घालणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. परवाना दिलेल्या रिक्षांमध्ये 8 ते 10 विद्यार्थी अक्षरश: कोंबले जातात.  ते रिक्षांमध्ये लटकत असल्याचे द‍ृश्य असते. त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा आहे.