Thu, Jul 18, 2019 00:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दाऊदचा हस्तक रियाज भाटीविरुद्ध खंडणीचा गुन्हा 

दाऊदचा हस्तक रियाज भाटीविरुद्ध खंडणीचा गुन्हा 

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 1:48AMठाणे : प्रतिनिधी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मुंबईतील खास हस्तक म्हणून ओळखला जाणारा रियाज भाटी व त्याच्या चार साथीदारांविरुद्ध ठाणे खंडणी विरुद्ध पथकाने अपहरण, जीवे ठार मारण्याची धमकी देणे व खंडणीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. अंबरनाथ येथील एका बिल्डरला खंडणीसाठी धमकवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित बिल्डरास छोटा शकील याने देखील याच प्रकरणी धमकी दिल्याचे समोर आले असून छोटा शकीलवर देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अंबरनाथ येथील तक्रारदार 52 वर्षीय बिल्डर यांची मुंबईस्थित बिल्डर कमल जदवानी यांच्या सोबत ओळख होती. दरम्यान जदवानी यास अंधेरी येथील म्हाडा अंतर्गत येत असलेल्या स्टेडियम व्ह्यू कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटचे काम मिळाले होते. मात्र जदवानीकडे हे काम पूर्ण करण्यासाठी पुरेसा पैसा नसल्याने त्याने अंबरनाथ येथील तक्रारदार बिल्डराकडे मदत मागितली होती. त्यानुसार अंबरनाथ येथील बिल्डराने जदवानी यास 70 लाख रुपये आणि 4500 स्के. फुटाच्या कामाचे रॉ मटेरियल दिले होते. या कामाचे रीतसर अ‍ॅग्रीमेन्ट देखील करण्यात आले होते. मात्र जदवानी याने हे अ‍ॅग्रीमेन्ट रद्द करण्यासाठी व अंबरनाथ येथील बिल्डराने दिलेले पैसे परत न मागण्यासाठी दाऊदचा खास हस्तक रियाज भाटी यास या प्रकरणात टाकले. 

दरम्यान जून 2012 मध्ये जदवानी, रियाज भाटी, अफगाण बाबू खान, जीनत फावद अहमद याचा भाऊ खालिद व उस्मान यांनी तक्रारदार बिल्डरच्या अंबरनाथ येथील कार्यालयात घुसून त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावून त्यांचे अपहरण केले. तसेच छोटा शकील यास देखील फोन करायला लावून तक्रारदार बिल्डरास अ‍ॅग्रीमेंन्ट रद्द करण्यासाठी धमकावले. त्यानंतर रियाज भाटी व अफगाण खान यांनी तक्रारदार यांच्या सह्या कॅन्सलेशन अ‍ॅग्रीमेंन्टवर जबरदस्तीने घेतल्या. तसेच स्टेडियम व्ह्यू कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटचे काम अक्मे डेव्हलपर्स यांना देण्यास भाग पाडले. इतकेच नव्हे तर तक्रारदार यांच्याकडून घेतलेले 70 लाख रुपये देखील परत केले नाही. दरम्यान, इक्बाल खंडणीप्रकरण समोर येताच अंबरनाथ येथील बिल्डराने हिम्मत करून याप्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे सोपवला. या प्रकरणात रियाज भाटी व त्याच्या साथीदारांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासातून समोर आल्यानंतर ठाणे खंडणी विरोधी पथकाने याप्रकरणी अंबरनाथ येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.