Wed, Jun 26, 2019 11:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धर्मा पाटील यांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन

धर्मा पाटील यांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन

Published On: Jan 30 2018 2:17AM | Last Updated: Jan 30 2018 1:53AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

धर्मा पाटील यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन केले जाणार असून एक महिन्याच्या आत व्याजासहीत सुधारित मोबदला दिला जाणार आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या आश्‍वासनानंतर धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे पार्थिव स्वीकारले. ज्या अधिकार्‍यांनी मोजणी आणि मोबदला देण्यात चूक केली, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्‍वासनही राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहे.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील विखरण येथील 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी 22 जानेवारी रोजी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जे. जे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना अखेर रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. 

मात्र, जोपर्यंत जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही आणि दोषींवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत त्यांचे पार्थिव ताब्यात घेण्यास त्यांच्या कुटुंबीयांनी नकार दिला होता. त्यामुळे राज्य सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. त्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी जे. जे. रुग्णालयात धाव घेत त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांची समजूत काढली. तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना जमिनीच्या फेरमूल्यांकनाचे लेखी पत्र दिले.

1 जानेवारी 2012 च्या पंचनाम्याची तपासणी करुन नियमानुसार फेरमुल्यांकन केले जाईल. शेतातील फळ झाडांचे  व शेतीच्या क्षेत्राफळानुसार मोबदला मिळाला की नाही ते देखील तपासली जाईल. फेरमुल्यांकन करुन येत्या 30 दिवसात व्याजासहीत मोबदला दिला जाईल. 

इतर शेतकर्‍यांना जास्त व धर्मा पाटील यांना कमी मोबदला दिला असेल तर याबाबीचीही चौकशी केली जाईल, असे आश्‍वासन बावनकुळे यांनी दिले. त्यानंतर धर्मा पाटील यांचे पार्थिव नरेंद्र पाटील यांनी ताब्यात घेतले व ते धुळ्याकडे रवाना झाले.

भूसंपादनाची प्रक्रिया आघाडीच्या काळात धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया ही मागील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात करण्यात आली असून त्यांच्या मृत्युस तत्कालिन आघाडी सरकार व मंत्रीच जबाबदार असल्याचा प्रतिहल्ला पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी चढविला. आपण स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धर्मा पाटील यांच्या मृत्युप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे रावल यांनी सांगितले. ते जे. जे. रुग्णालयात पत्रकारांशी बोलत होते. 

धर्मा पाटलांचे होणार अवयवदान ; कुटुंबीयांचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी

धर्मा पाटील या 84 वर्षीय मृत शेतकर्‍याच्या कुटुंबियांनी सुजाणपणा दाखवत त्यांचे दोन्ही डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी कोणत्याही दबावाशिवाय, स्वेच्छेने आपल्या वडिलांचे दोन्ही डोळे दान करण्यासाठी  रविवारी रात्री रुग्णालय प्रशासनाकडे अवयवदान संमतीचा अर्ज दाखल केला.

22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन करत आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मा पाटील यांना तातडीने जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तीन वेळा डायलिसीस करण्यात आले होते. पाटील यांना डॉक्टरांनी वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र शेवटच्या क्षणी मुलगा नितीन पाटील व नातू रोहन सोनवने यांनी धर्मा पाटील यांचे दोन्ही डोळे दान करण्याचा निर्णय घेऊन तसा अर्जही जे. जे. रुग्णालय प्रशासनाकडे रविवारी रात्री 7सादर केला. 

रविवारी रात्री उशिरा धर्मा पाटील यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आल्यानंतर डोळे प्रत्यारोपणासाठी योग्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर शस्रक्रिया करुन त्यांचे डोळे डोळ्यांच्या प्रतिक्षेत असणार्‍या दुसर्‍या रुग्णाला दान करण्यात आले