Wed, Jun 26, 2019 18:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रहाटकरांची माघार; राज्यसभा निवडणूक बिनविरोध

रहाटकरांची माघार; राज्यसभा निवडणूक बिनविरोध

Published On: Mar 16 2018 1:26AM | Last Updated: Mar 16 2018 1:05AMमुंबई : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाने आपल्या चौथ्या उमेदवार विजया रहाटकर यांची उमेदवारी मागे घेतल्याने राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून, भाजपच्या तीन जागांसाठी प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आपापल्या संख्याबळानुसार एकेक उमेदवार उभा केला आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार असे वाटत असतानाच भाजपने महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने चुरस निर्माण झाली होती. 

निवडणूक झाली असती तर काँग्रेसच्या कुमार केतकर यांनाच धोका निर्माण झाला असता. मात्र, रहाटकर या डमी उमेदवार असल्याचे संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी कालच जाहीर केले होते. आज बापट यांनी अधिकृतपणे रहाटकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. आपण रहाटकर यांचे प्रतिनिधी म्हणून अर्ज मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले.