Thu, Sep 19, 2019 03:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्रातील ४८ जागांचा कल उद्या दुपारपासून, निकाल ४ पर्यंत अपेक्षित

महाराष्ट्रातील ४८ जागांचा कल उद्या दुपारपासून, निकाल ४ पर्यंत अपेक्षित

Published On: May 22 2019 4:18PM | Last Updated: May 22 2019 4:18PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबतची उत्कंठा शिघेला पोहोचली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या (दि.२३) दुपारी राज्यातील कल येण्यास सुरुवात होईल आणि संध्याकाळी ४ पर्यंत निकाल येतील, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

राज्यात चार टप्प्यांत झालेल्या निवडणुकीत एकूण ९८,४३० इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा (ईव्हीएम) वापर करण्यात आला. उद्या राज्यातील ३८ ठिकाणी ४८ केंद्रावर मतमोजणी होईल. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत राज्यातील कल हाती येण्यास सुरुवात होतील आणि संध्याकाळी ४ पर्यंत निकाल येतील, असेही निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. राज्यातील एवढ्या जागांसाठी ११, १८, २३ आणि २९ एप्रिल असे चार टप्प्यांत मतदान झाले. राज्यांत ८६७ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात गेल्या २०१४ मधील निवडणुकीत ६०.३२ टक्के मतदान झाले होते. यावेळी किचिंत अधिक म्हणजे ६०.८० टक्के मतदानाची नोंद झाली.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पालघर आणि भिंवडीत मतमोजणीच्या सर्वाधिक प्रत्येकी ३५ फेऱ्या होतील. त्यानंतर भंडारा- गोंदियात ३३ आणि बीड, शिरुरमध्ये ३२ फेऱ्यांत मतमोजणी होईल. हातकणंगलेत सर्वात कमी १७ फेऱ्या होतील. अमरावती आणि सांगलीत प्रत्येकी १८ फेऱ्यात मतमोजणी होणार आहे.

यावर पहा निकाल...
मतमोजणीची माहिती आणि कल ceo.maharashtra.gov.in या वेबसाईटवर अपलोड केली जाणार आहे. तसेच ही माहिती १९५० या टोल फ्री क्रमांकावर दिली जाईल. सचिवालयात अनेक डिजीटल होर्डिंग लावले आहेत. वाहतूक पोलिसांच्या डिजीटल साईनबोर्डवर प्रथमच निकाल पाहण्याची व्यवस्था केली आहे. जिल्हास्तरावर प्रत्येक फेरीनंतर निकालाची माहिती पुरविली जाणार आहे, असेही निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (नागपूर), हंसराज अहिर (चंद्रपूर), सुभाष भामरे (धुळे), अनंत गीते (रायगड), महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण (नांदेड), माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (सोलापूर) या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.