Thu, Apr 25, 2019 17:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जव्हार, वाड्यात शिवसेनेचा झेंडा

मंत्री विष्णू सावरांच्या मुलीचा पराभव, सेनेच्या कोलेकर विजयी

Published On: Dec 19 2017 2:02AM | Last Updated: Dec 19 2017 2:02AM

बुकमार्क करा

जव्हार/वाडा/डहाणू

आगामी विधानसभा निवडणुकीची लिटमस चाचणी तसेच राज्याचे आदिवासी विकासमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार, वाडा आणि डहाणू नगर परिषदांच्या निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. जव्हार आणि वाड्यात शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली आहे. डहाणूत भाजपने शिवसेनेला मात देऊन कमळ फु लवले असले तरी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांची कन्या निशा सवरा यांचा वाड्यात नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव झाल्याने पेढा आणि वडा अशी अवस्था भाजपची झाली आहे.

जव्हारमध्ये शिवसेनेने 17 पैकी 9 जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. येथे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागांवर समाधान मानावे लागले. जव्हार प्रतिष्ठान आणि भाजप युतीला मतदारांनी नाकारले असून त्यांना केवळ 2 जागा मिळाल्या आहेत. येथे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांत (भिकू) पटेल विजयी झाले.

वाड्यात शिवसेनेला 6, भाजप 6, काँग्रेस 2, बविआ 1, आरपीआय 1, राष्ट्रवादी काँग्रेस 1 याप्रमाणे मतदारांनी कौल दिला आहे. वाड्यातील जनतेने दिलेला हा कौल कौतुकास्पद असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र, विष्णू सवरा यांची कन्या निशा सवरा यांचा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या गीतांजली कोलेकर यांनी पराभव केल्याने सवरा यांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. डहाणूत भाजपने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ही निवडणूक प्रतिष्ठेची करून सर्व जागा लढवणार्‍या शिवसेनेचा दारूण पराभव करून कमळ फु लवले. येथे भाजपने 15, राष्ट्रवादी काँग्रेसने 8 जागा मिळवल्या असून शिवसेनेला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले. येथे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या भरत राजपूत यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे मिहिर शहा यांचा 2609 मतांनी पराभव केला.