Sun, May 19, 2019 13:57
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महामार्गांलगतच्या बांधकामांवर येणार निर्बंध!

महामार्गांलगतच्या बांधकामांवर येणार निर्बंध!

Published On: May 21 2018 1:37AM | Last Updated: May 21 2018 1:25AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यातील महार्गांवरील बांधकामांवर निर्बंध घालण्याचा विचार राज्य सरकार करत असून, रस्त्यालगत उभारण्यात येणार्‍या इमारतींच्या नियंत्रण रेषेच्या अंतरात लवकरच वाढ करण्यात येणार आहे. 

नागरीकरणाचा वेग जसजसा वाढतो, त्या प्रमाणात शहरी व ग्रामीण भागातील औद्योगीकरणात देखील वाढ होत आहे. मुख्य रस्त्यालगत फॅक्टरी, सिनेमा हॉल, व्यापारी संकुल, गोडाऊन, मार्केट यांसारख्या गर्दीच्या ठिकाणांची संख्याही  वाढत आहेत. रस्त्यालगतच्या इमारतींना चांगला भाव मिळत असल्याने विकासकदेखील शहर, जिल्ह्यातील मार्गालगत बांधकाम करण्यावर भर देत आहेत. रस्त्याच्या बाजूला उभी राहणारी बांधकामे व अरुंद रस्ते यामुळे वाहतुकीस मात्र अडथळे निर्माण होतात. वाहनांची वाढती गर्दी विचारात घेता रस्त्यालगतच्या बांधकाम अंतरात वाढ करण्यात येणार आहे. आता पथकिनारवर्ती नियमावलीत सुधारणा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एक समिती गठीत केली आहे. ही नियमावली केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाच्या 1977 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार

तयार करण्यात आली आहे. 2001 मध्ये यामध्ये काही सुधारणा करून रस्त्यांच्या दोन्ही बाजूस करण्यात येणार्‍या बांधकांबाबत इमारत रेषा आणि नियंत्रण रेषेचे अंतर ठरवून देण्यात आले. त्यानुसार सध्या द्रुतगती महामार्गासाठी रस्त्याच्या मध्यापासून 60 मीटर किंवा हद्दीपासून 15 मीटर इमारत रेषा निश्‍चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय मार्गासाठी शहरात रस्त्याच्या हद्दीपासून 3 ते 6 मीटर व शहरात 40 मीटर, राज्य महामार्गांसाठी  रस्त्याच्या मध्यापासून 20 मीटर अथवा हद्दीपासून 4.5 मीटर, जिल्हा महामार्गासाठी रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटर अथवा हद्दीपासून 4.5 मीटर अंतर ठरवून देण्यात आले आहे. रत्यावरील वाहनांची वाढती संख्या विचारात घेता राज्यातील सर्व रस्त्यांवरील इमारत व नियंत्रण रेषेमधील अंतरात वाढ करण्यात येणार आहे.