Sun, Apr 21, 2019 13:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरक्षण प्रश्‍न सोडवण्यास निकालाने बळ : मुख्यमंत्री

आरक्षण प्रश्‍न सोडवण्यास निकालाने बळ : मुख्यमंत्री

Published On: Aug 04 2018 1:40AM | Last Updated: Aug 04 2018 1:39AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

राज्यात मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलने सुरू असली, तरी हे प्रश्‍न आम्हीच सोडवू शकतो, असा विश्‍वास जनतेत असल्याचे चित्र सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महापालिकेच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. या निकालामुळे आरक्षणासह राज्याच्या विकासाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आपल्याला पाठबळ मिळाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे राज्यातील वातावरण तापले असून, या पार्श्‍वभूमीवर झालेल्या सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीच्या निकालाकडे डोळे लागले होते. विशेषत: मराठा मतदारांचा भरणा असलेल्या सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत मराठा मते कोणाकडे वळतात, याबाबत उत्सुकता होती. या महापालिका निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्याने आणि भाजपनेही आपली शक्‍ती पणाला लावल्याने उत्सुकता वाढली होती. मात्र, मराठा आंदोलनामुळे कोंडीत सापडलेल्या भाजप सरकारला सांगलीतील निकाल दिलासा देणारा ठरला.   

या निकालाबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलने सुरू आहेत. मात्र, आंदोलने आणि मोर्चांनंतरही जनतेचा विश्‍वास हा आमच्यावरच आहे, हे निकालाने स्पष्ट झाले आहे. मराठा, धनगर समाजाच्या मागण्या न्यायपूर्ण आहेत. जनतेला विश्‍वास आहे की, आज मांडण्यात येणार्‍या मागण्या काही आज तयार झालेल्या नाहीत. त्या गेल्या चाळीस-पन्‍नास वर्षांपासूनच्या आहेत. सरकार ते सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.

या निकालामुळे आरक्षणाबरोबरच विकास आणि रोजगाराचे प्रश्‍नही सोडविण्यास पाठबळ मिळाले आहे. या निकालाबद्दल मुख्यमंत्र्यांनी सांगलीच्या निकालाबद्दल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, खा. संजय पाटील तसेच स्थानिक आमदार आणि नेत्यांचे कौतुक केले. तर, जळगावमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे अभिनंदन केले.