Sun, Jul 21, 2019 12:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ओमकार बिल्डर्सविरोधात मंत्रालयात मालाडच्या रहिवाशांचा आक्रोश

ओमकार बिल्डर्सविरोधात मंत्रालयात मालाडच्या रहिवाशांचा आक्रोश

Published On: Feb 02 2018 2:01AM | Last Updated: Feb 02 2018 1:48AMमुंबई  ः विशेष प्रतिनिधी

एसआरए योजनेतून घरे बांधून देतो, असे सांगत गेल्या अकरा वर्षांपासून फसवणूक करणार्‍या ओमकार बिल्डर्सच्या विरोधात मालाड येथील जानू भोईर नगरमधील रहिवाशांनी मंत्रालयात डोके आपटून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. न्यायासाठी सरकारच्या दरबारात आलेल्या या गोरगरीब रहिवाशांची बाजू ऐकणे तरच दूरच, त्याऐवजी गचांडी धरत पोलिसांनी त्यांना वाहनांमध्ये कोंबून थेट मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेले. आम्ही आमच्या घरासाठी लढत आहोत, आम्हाला अटक करू नका, असा टाहो फोडून सांगणार्‍या या रहिवाशांकडे पोलिसांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले.

कुरार व्हिलेजमधील जानू भोईर गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांनी 2007 मध्ये ओमकार बिल्डरसोबत एसआरएच्या माध्यमातून घरांसाठी करार केला होता. करारानंतर 2011 मध्ये बिल्डरने रहिवाशांची घरे पाडल्यापासून 2015 पर्यंत  त्यांना घरभाडे दिले. या कालावधीमध्ये बिल्डरने 9 पैकी 6 इमारती बांधल्या तर तीन इमारतींचे बांधकाम रखडले आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतींमधील सदनिका आम्हाला द्याव्यात, अशी मागणी करायला सुरुवात केल्यानंतर ओमकार बिल्डरने गेल्या दोन वर्षांपासून रहिवाशांना घरभाडे देणे थांबविले आहे. आपण सर्वच अपात्र आहात, असे सांगून बिल्डर काखा वर करु लागल्यामुळे फसगत झालेल्या 60 रहिवाशांनी थेट मंत्रालय गाठून आपले गार्‍हाणे मांडण्याचा प्रयत्न केला.

रहिवाशांच्या शिष्टमंडळाने गृहनिर्माण विभागाच्या सचिवांसमोर आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचला. चार वर्षे बिल्डरने आम्हाला घरभाडे दिले आहे. आता सहा इमारती पूर्ण झाल्यावर त्याने आम्हाला अपात्र कसे ठरविले, असा सवाल उपस्थित करणार्‍या एका रहिवाशाच्या संयमाचा बांध फुटला. तिसर्‍या मजल्यावरील जिन्याजवळ येऊन त्याने त्रिमुर्ती प्रांगणात धरणे धरुन बसलेल्यांकडे ओरडून आपला संताप व्यक्त केला. अनेकांनी आपले डोके आपटून घेत आपला उद्रेक व्यक्त केला. त्यामुळे मंत्रालयात पोलिसांची एकच धावपळ झाली.

मंत्रालय सुरक्षाव्यवस्था पोलीस उपायुक्त प्रशांत खैरे व मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी प्रसंगावधान राखून तत्काळ अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवला. आपण आंदोलन मंत्रालयाच्या बाहेर करा, असे या दोन्ही अधिकार्‍यांनी रहिवाशाना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकानेही प्रतिसाद दिला नाही. रहिवाशी प्रचंड संतप्त झाले होते. त्यांना धरुन मंत्रालयाबाहेर नेण्याचा पोलीस प्रयत्न करत असताना अनेकांनी आपले डोके आपटून घेत आपले गार्‍हाणे मांडण्याचा प्रयत्न केला.