होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चेंबूरच्या मोक्ष इमारतीतील रहिवासी ४० वर्षांपासून बेघर

चेंबूरच्या मोक्ष इमारतीतील रहिवासी ४० वर्षांपासून बेघर

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 15 2017 2:10AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रसाद जाधव

चेंबूरच्या गावठाण भागात बांधण्यात आलेल्या मोक्ष इमारतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून गेल्या 40 ते 50 वर्षांपासून राहत असलेले स्थानिक रहिवासी आजही बेघर आहेत. पुनर्विकासाच्या नावाखाली करारनामा करून इमारत बांधण्यात आली. त्यात काही जणांना घरे देण्यात आली. तर अजूनही काही जण घरांच्या  प्रतीक्षेत आहेत. रहिवाशांना  पालिकेने इमारत प्रस्ताव विभागाकडून ओसी, सीसी प्राप्त नसल्याने घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. 
चेंबूर गावठाणमध्ये मोडकळीस आलेली चाळ होती. त्यामध्ये गेल्या 40 ते 50 पन्नास वर्षांपासून काही जण भाडेतत्त्वावर राहायचे. पालिकेच्या विधी विभागात अधिकारी पदावर कार्यरत असलेले

अमोल कांबळे याच्या पत्नी सुरेखा (अमृता)अमोल कांबळे यांनी सदर जमिनीचे अधिकार विकत घेतले.  मालक सुरेखा अमोल कांबळे यांनी जुन्या रहिवाशांच्या सोबत पुनर्विकासाचा करार करून त्यांना घरे देण्याचे मान्य केले होते. त्यानंतर त्यांनी हे अधिकार रॉकवेल बिल्डकॉन यांना दिले. या जमिनीवर सातमजली मोक्ष नावाची इमारत बांधण्यात आली. पुनर्विकास करारानुसार येथील काही जणांना नोव्हेंबर 2014 मध्ये कोणतेही ताबापत्र न देता पाच हजारांची मागणी करून सदनिकेच्या चाव्या दिल्या. मात्र, उर्वरित अनेक जण आजही सदनिका मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ज्यांना 2014 मध्ये घरे देण्यात आली त्यांच्याकडून जमीन मालक सुरेखा कांबळे यांचे पती अमोल कांबळे हे आपल्या सहीने हिंदू एकत्रीत कुटूंब प्रमुख म्हणून सदनिकाधारकांना भाडे पावती देत असल्याची माहिती स्थानिक रहिवासी  नंदकुमार सुतार यांनी दिली. 

येथील निर्मला थळी यांच्या घराची व समोर असलेली जागा मोठी असल्याने त्यांना नव्याने बांधण्यात आलेल्या मोक्ष इमारतीत 180 स्वेअर फुटाच्या दोन सदनिका देतो म्हणून सांगण्यात आले होते. मात्र, केवळ एकच सदनिका देण्यात आली. त्यामध्येही घरभाडे विकासक भरत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यांनाही सध्या पालिकेने घर खाली करण्याची नोटीस बजावली. जे चाळकरी या इमारतीत राहतात त्यांना घुसखोर दाखवून त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया या दाम्पत्याने सुरू केली आहे. पालिकेच्या मुख्य अभियंता, इमारत प्रस्ताव पूर्व उपनगरे यांनी 24 जानेवारी 2017 ला या इमारतीत राहणार्‍या रहिवाशांना ओसी, सीसी नसल्याने नोटिसा बजावल्याने या ठिकाणी राहणार्‍या रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ येणार आहे.