होमपेज › Mumbai-Thane-Raigad › निवासी डॉक्टरांचा संप मागे, रुग्णांना दिलासा(video)

निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे(video)

Published On: May 22 2018 5:47PM | Last Updated: May 22 2018 8:33PMमुंबई  : प्रतिनिधी            

गेल्या तीन दिवसांपासून जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप अखेर आज मंगळवार (दि २२ मे ) रोजी मागे घेण्यात आला. डॉक्‍टरांना मारहाण केल्‍याच्या निषेधार्थ जे.जे रूग्णालयातील डॉक्टरांनी संप पुकारला होता. मात्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री गिरीश महाजन यांनी मागण्या माण्य करण्याचे लेखी आश्वासन दिल्‍याने हे आंदोलन मागे घेत असल्‍याचे जाहिर करण्यात आले.

याविषयी अधिक माहिती अशी की, जे. जे. रुग्णालयाच्या 11 क्रमांकाच्या वॉर्डमधील दोन डॉक्टरांना एका रुग्णाच्या नातेवाईकांनी शनिवारी बेदम मारहाण केली होती. या घटनेच्या निषेधार्थ जे.जे. रुग्णालयातील 400 पेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपावर गेले होते. त्यानंतर मुंबईतील सायन, कामा, जीटी आणि सेंट जॉर्ज रुग्णालयांच्या डॉक्टरांनी जे.जे.च्या डॉक्टरांना पाठिंबा देत सोमवारी हाताला काळ्या रिबिन बांधून आंदोलन केले होते. दरम्‍यान आज वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत मार्डची बैठक झाली. यात  मार्डच्या  बहुतांश मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन सरकार कडून मिळाल्याने आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. संप मिटल्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला.