होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत निवासी डॉक्टरांचा संप सुरूच!

मुंबईत निवासी डॉक्टरांचा संप सुरूच!

Published On: May 21 2018 1:52AM | Last Updated: May 21 2018 1:39AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईच्या जे.जे. रुग्णालयातील दोन ज्युनियर निवासी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मार्डच्या निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप रविवारी दुसर्‍या दिवशीही सुरूच होता. शनिवारी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्याने डॉक्टरांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

निवासी डॉक्टरांना करण्यात आलेल्या मारहाणीमुळे जे. जे. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका सर्वांनी आंदोलन करत शनिवारपासून संप पुकारला आहे.रविवारी जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता सुधीर नणंदकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक आणि आरोग्यमंत्री यांच्यासोबत मार्डच्या डॉ़क्टरांची चर्चा झाली. या चर्चेने डॉक्टरांचे समाधान न झाल्याने बैठक निष्फळ ठरली.

जर प्रशासनाकडून सोमवारी यासंदर्भात योग्य ती पावले उचलली गेली नाहीत तर निवासी डॉक्टरांनी आपत्कालीन सेवाही बंद ठेवण्याचा इशारा दिला. दरम्यान रविवारी रात्री उशिरा जे. जे. रुग्णालयाच्या आवारात मार्डच्या निवासी डॉक्टरांकडून मेणबत्ती मोर्चाचे आयोजनही करण्यात आले होते.

मार्डचे जे.जे. रुग्णालयातील अध्यक्ष डॉ. सारंग दोनारकर म्हणाले, निवासी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या कामबंद आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत डॉक्टरांच्या मागण्यांवर कुठलाही विचार झालेला नाही. डॉक्टरांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा, प्रत्येक वॉर्डात एक सुरक्षा रक्षक नेमा तसेच अशी एखादी घटना अचानक घडल्यास डॉक्टरांना तातडीने मदत मिळावी यासाठी अलार्मची व्यवस्था करा, अशी डॉक्टरांची मागणी आहे.