Mon, Jun 24, 2019 21:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › निश्‍चित वेळेत आरक्षण देऊ

निश्‍चित वेळेत आरक्षण देऊ

Published On: Aug 03 2018 2:18AM | Last Updated: Aug 03 2018 2:18AMमुंबई : खास प्रतिनिधी

मराठा समाजाला कालबद्ध आणि निश्‍चित वेळेत आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार पूर्ण सकारात्मक असल्याची ग्वाही गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा दिली आहे. आरक्षणासाठी सुरू झालेल्या आंदोलनासंदर्भात मराठा समाजातील मान्यवरांना आज मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी आमंत्रित केले होते. या चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना कायद्याच्या पातळीवर टिकेल, असे आरक्षण देण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्नशील असून, कुठल्याही आंदोलनादरम्यान हिंसा करू नये तसेच आत्महत्येचे पाऊल कोणीही उचलू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. या मान्यवरांनीही एका संयुक्‍त पत्रकाद्वारे हेच आवाहन केले आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलनाचा भडका उडाला आहे, मूक मोर्चांनंतर हा प्रश्‍न न सुटल्याने मराठा समाजाने आता ठोक मोर्चांना सुरुवात केली. गेल्या काही दिवसांत रास्ता रोको, तसेच अन्य मार्गाने आणखी तीव्र झालेल्या या आंदोलनास आता हिंसक वळण मिळाले आहे. या पार्श्‍वभूमीवर मराठा समाजातील मान्यवरांची एक बैठक गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर आयोजित केली होती. आ. ह. साळुंखे, डॉ. सदानंद मोरे, आ. विनायक मेटे, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार,  उद्योजक हनुमंतराव गायकवाड, अभिनेते सयाजी शिंदे, शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले, प्रकाश पोहरे, पांडुरंग बलकवडे, सुरेश हावरे, बी. बी. ठोंबरे, डॉ. अमोल कोल्हे आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, संभाजी निलंगेकर, सुभाष देशमुख, एकनाथ शिंदे हे मंत्री या बैठकीस उपस्थित होते. 

सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत या मान्यवरांशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सविस्तर चर्चा केली. मराठा आरक्षणासह सकल मराठा समाजाच्या अन्य मागण्यांवर सरकारकडून सुरू असलेल्या कार्यवाहीबद्दल फडणवीस यांनी या मान्यवरांना माहिती दिली.

आरक्षण देताना कोणती खबरदारी घ्यावी, यासाठी अनेक सूचना या मान्यवरांनी सरकारला केल्या. त्यावर नक्‍की विचार केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजासाठी शासनाने केलेल्या उपाययोजना, घेतलेले निर्णय व त्याची होत असलेली अंमलबजावणी याबाबत माहिती देण्यात आली. समाजाला आरक्षण देण्यासाठी काय करता येईल, शिवाय राज्यात शांतता राखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याबाबत अनेकांनी सूचना मांडल्या. मागासवर्गीय आयोगाचे काम वेगाने सुरू असून, आयोगाचा अहवाल आल्यानंतर विशेष अधिवेशन बोलवून आरक्षणाबाबत वैधानिक कार्यवाही करण्यात येईल, तोपर्यंत मराठा समाजातील आंदोलकांनी शांतता ठेवावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

बैठकीत मराठा समाजाला कायदेशीर कसोटीवर टिकणारे आरक्षण लवकरात लवकर मिळावे, यासाठी शासनाने तत्काळ उचित पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली, त्यास मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली.

दरम्यान, आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मराठा समाजातील तरुण शिक्षण आणि उद्योग उभारणीत मागे पडू नयेत, यासाठी आर्थिक मागासाची मर्यादा आठ लाखांपर्यंत वाढविल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यासाठी असलेल्या राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ गेल्यावर्षी अडीच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना झाला असून, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून तरुणांनी उद्योगासाठी घेतलेल्या दहा लाखांपर्यंतच्या कर्जाचे व्याज शासन भरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, कृषी, उद्योग क्षेत्राच्या आमूलाग्र बदलाबाबतच्या तसेच आरक्षणासाठी तामिळनाडू पॅटर्नचा उपयोग करावा, अशा अनेक सूचना मान्यवरांनी केल्या. सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवून त्या योजनांमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, यासाठी प्रचार आणि प्रसार यंत्रणा सक्षम करण्याची सूचनाही केली गेली. या तज्ज्ञांनी मांडलेल्या सर्व सूचनांचे स्वागत करून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने बदल घडवून आणला जाईल, असे आश्‍वासन देताना या बदलाच्या प्रक्रियेत सर्वांनी सक्रिय साथ द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

मान्यवरांचे पत्रक

या बैठकीस उपस्थित असलेल्या मान्यवरांनी एक संयुक्‍त पत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रकात म्हटले आहे : - मराठा समाजाच्या मागण्या न्याय्य व वास्तव असून, त्याकरिताच मोठ्या संख्येने मोर्चे निघाले व आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला कायदेशीर कसोटीवर टिकणारे आरक्षण लवकरात लवकर मिळावे, याकरिता शासनाने तत्काळ उचित पावले उचलावीत, असे आवाहन या बैठकीत या करण्यात आले. महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने कुठेही हिंसाचार होऊ नये, तसेच कुणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असेही आवाहन या बैठकीत करण्यात आले.