Sun, Jul 21, 2019 05:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई :

दादर शिवाजीपार्क येथील महापौर बंगल्याचे आरक्षण बदलून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक असे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला मंगळवारी सुधार समितीत एकमताने मंजुरी देण्यात आली. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

शिवाजीपार्क येथील भव्य जागेत व मोक्याच्या ठिकाणी उभ्या असलेल्या महापौर बंगल्याचे रूपांतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकात होणार आहे. याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या भूखंडावर महापौर निवासस्थान असे आरक्षण बदलून तेथे बाळासाहेब ठाकरे स्मारक असे आरक्षण टाकण्यात येणार आहे. या प्रस्तावाला सुधार समितीत मंजुरी मिळाल्यामुळे आता महापालिका सभागृहाची अंतिम मंजुरी घेऊन आरक्षण बदलण्यात येणार आहे. विशेष म्हणजे याचा समावेश 2014-34 च्या विकासआराखड्यातही करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. 

दरम्यान, आरक्षण बदल करण्यास पालिका सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर तो प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास विभागाला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर नागरीकांकडून सूचना व हरकती मागवल्या जाण्याची शक्यता आहे. महापौर निवासस्थान सागरी किनारा संरक्षण क्षेत्रात मोडत आहे. त्यामुळे कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी केंद्रीय पर्यावरण विभागाची परवानगी आवश्यक राहील, असे पालिका प्रशासनाने या प्रस्तावात स्पष्ट केले आहे.