होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिपब्लिकन ऐक्य; आठवले तयार, आता आंबेडकरांना भेटणार

रिपब्लिकन ऐक्य; आठवले तयार, आता आंबेडकरांना भेटणार

Published On: Feb 18 2018 2:00AM | Last Updated: Feb 18 2018 1:32AMमुंबई : प्रतिनिधी 

रिपब्लिकन ऐक्य होणे ही काळाची गरज आहे. बहुजन समाजाला सोबत घेऊन रिपब्लिकन पक्षाला सत्तेपर्यंत नेण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य होणे आवश्यक आहे, त्यामुळे सर्वांनी त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले सकारात्मक असल्याची माहिती रिपब्लिकन पक्ष (गवई गट) राष्ट्रीय सरचिटणीस डॉ राजेंद्र गवई यांनी दिली. गवई यांनी शुक्रवारी आठवलेंची भेट घेतली व कोरेगाव भीमा प्रकरणी झालेल्या बंदनंतर गुन्हे नोंदवलेल्या दलित तरूणांच्या सुटकेसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. 

रिपब्लिकन ऐक्यासाठी इतर कोणताही समर्थ पर्याय समाजासमोर नाही, रिपब्लिकन ऐक्यासाठी आपण सदैव तयार आहोत असे स्पष्ट करत रिपब्लिकन ऐक्याचा प्रस्ताव आपण स्वीकारत असल्याचे आठवले यांनी गवई यांच्याकडे स्पष्ट केले. 

गवई यावेळी म्हणाले,  रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकर व  रामदास आठवले  यांनी एकत्र येणे महत्वाचे आहे. या दोघांशिवाय रिपब्लिकन ऐक्य अपूर्ण आहे. रिपब्लिकन  ऐक्याचे हे दोघे नेते दोन आधारस्तंभ  असून त्यापैकी आठवले ऐक्याला तयार असल्याची सकारात्मक बाजू समाजासमोर अली आहे आता  ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकरांना प्रस्ताव देण्यासाठी आपण त्यांची लवकरच भेट घेणार असल्याचे गवई म्हणाले. 

महाराष्ट्र बंद आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील कलम 307 आणि 195 चे गुन्हे काढून टाकण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी  आपणास आश्वासन दिले आहे तसेच यासंदर्भातील आंबेडकरी आंदोलकांवरील  सर्वच खटले सरकारने काढून टाकावेत अशी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली असल्याचे व त्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक  असल्याची माहिती आठवले यांनी गवई यांना दिली.