Thu, Apr 25, 2019 23:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बंद जकातनाक्यांच्या जागेचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी मागवला

बंद जकातनाक्यांच्या जागेचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी मागवला

Published On: Feb 21 2018 1:47AM | Last Updated: Feb 21 2018 1:38AM मुंबई : प्रतिनिधी 

शहर व पश्‍चिम उपनगरांप्रमाणे पूर्व उपनगरांतही स्वतंत्र आरटीओ उभारण्याची मागणी भाजपाने लावून धरली आहे. एवढेच नाही तर, या आरटीओसाठी मुलुंड जकात नाक्याच्या जमिनीचा प्रस्तावही मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असून याबाबतचा अहवाल मागवला असल्याचे समजते. 

मुंबईत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या नोंदणीसाठी सध्या उपलब्ध असलेले आरटीओ कमी पडत आहेत. मुंबईत शहरात ताडदेव व वडाळा येथे तर पश्‍चिम उपनगरांत अंधेरी व बोरिवली येथे आरटीओची कार्यालये आहेत. पण पूर्व उपनगरांत एकही आरटीओ कार्यालय नाही. पूर्वी घाटकोपर येथे आरटीओ कार्यालय होते. पण ते शहरातील वडाळा भागात स्थलांतरित झाल्यामुळे पूर्व उपनगरांतील मुलुंड, भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी, पवई, घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला या भागातील नागरिकांना वडाळा येथील आरटीओमध्ये जावे लागते.

पूर्व उपनगरांसाठी हा आरटीओ लांब असल्यामुळे वाहन नोंदणी, वाहन चालवण्याचा परवाना, रिक्षा, टॅक्सी व अन्य भाडोत्री वाहनांना पासिंगसाठी वडाळा गाठावे लागत आहे. त्यामुळे जकातनाक्यांच्या मोकळ्या जागेवर पूर्व उपनगरांसाठी आरटीओ कार्यालय उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली आहे.