Wed, Nov 14, 2018 10:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जोगेश्‍वरीत टळली एल्फिन्स्टन दुर्घटनेची पुनरावृत्ती !

जोगेश्‍वरीत टळली एल्फिन्स्टन दुर्घटनेची पुनरावृत्ती !

Published On: Dec 13 2017 2:30AM | Last Updated: Dec 13 2017 2:14AM

बुकमार्क करा

जोगेश्‍वरी : विशाल नाईक

जोगेश्‍वरी स्थानकातील अरुंद पादचारी पुलावर सोमवारी रात्री प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने  अडकलेल्या प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्याने एल्फिन्स्टन दुर्घटनेची पुनरावृत्ती थोडक्यात टळली. नव्या पादचारी पुलासाठी खोदून ठेवण्यात आलेले खड्डे प्रवाशांना स्थानकाबाहेर पडताना अडथळा ठरत आहेत.

जोगेश्वरी रेल्वे स्थानकाला पूर्वेकडून पश्चिमेला जोडणार्‍या पादचारी पुलाचे काम सुरू आहे.  पालिकेच्या पुल विभागाने यासाठी जागोजागी मोठाले खड्डे खोदून ठेवले आहेत.  दक्षिण दिशेला असलेला जोगेश्वरी फाटकावरील पुल अत्यंत अरुंद असल्याने  या पुलावर सकाळ,  सायंकाळी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होते. सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान अचानक पुलावर प्रवाशांची गर्दी होवून महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. प्रत्येक जण गर्दीतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असल्याने चेंगराचेंगरी होण्याची दाट शक्यता होती. 

काही जागरुक नागरिकांनी स्थानिक पोलीस, रेल्वे पोलीस, स्टेशन मास्तर यांना माहिती दिल्यानंतर पुलावर गर्दीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. पालिकेने जेसीबीच्या सहाय्याने माती टाकून खड्डा बुजवल्याने प्रवाशांचा मार्ग सुकर झाला आहे. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन एखादी दुर्घटना झाल्यानंतरच जागे होणार का, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. सुधार समिती अध्यक्ष, नगरसेवक अनंत नर, पंकज यादव आदींनी घटनास्थळाला भेट देत पादचारी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली. पालिकेचे पूल कार्यकारी अभियंता सतीश ठोसर यांच्याशी संपर्क साधला असता होवू शकला नाही.