Mon, Apr 22, 2019 12:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एस.टी.च्या निलंबित कर्मचार्‍यांना दिलासा

एस.टी.च्या निलंबित कर्मचार्‍यांना दिलासा

Published On: Jun 26 2018 1:21AM | Last Updated: Jun 26 2018 1:19AMमुंबई : प्रतिनिधी

वेतनवाढीसाठी अघोषित संप पुकारणार्‍या एस. टी. कर्मचार्‍यांवर केलेली निलंबनाची कारवाई मागे घेत प्रशासनाने कर्मचार्‍यांना दिलासा दिला आहे. वेतन कराराशी संबंध नसताना संपात सहभागी झाल्याने सेवेतील तब्बल एक हजार दहा कर्मचार्‍यांना एस.टी. प्रशासनाकडून कामावरून कमी करण्यात आले होते.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत एस.टी. प्रशासनाने संपकरी कर्मचार्‍यांवरील निलंबनाची कारवाई अखेर मागे घेण्याचा निर्णय घेतला. एक जुलैपासून त्या कर्मचार्‍यांची नव्याने नियुक्ती करण्याचे आदेश एस.टी. प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आले.

कामावरून कमी केलेल्या रोजंदारी कर्मचार्‍यांना पुन्हा एकदा संधी दण्यात यावी, त्यांना पुन्हा कामावर घ्यावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला केले होते. निलंबन केलेल्या कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती.

मागील दोन-तीन महिन्यांपासून रोजंदारी पद्धतीने एस.टी.च्या सेवेत रुजू झालेल्या या कर्मचार्‍यांचा अघोषित संपाशी काहीही संबंध नव्हता, तरीदेखील हे कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे एस.टी.चे आर्थिक नुकसान होताना प्रवाशांची प्रचंड प्रमाणात गैरसोयदेखील झाली. या सर्व पार्श्‍वभूमीवर स्थानिक प्रशासनाने अशा सर्व कर्मचार्‍यांची सेवा समाप्त केली होती.

सेवा समाप्तीचा हा निर्णय मागे घेण्याबाबत प्राप्त झालेल्या विनंतीचा सकारात्मक विचार करून हा निर्णय मागे घेण्याचे आदेश महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन  मंत्री दिवाकर रावते यांनी दिले. त्यानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अशा कर्मचार्‍यांना पुन्हा नव्याने नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला.