होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईसाठी रिलायन्सच्या १८ इलेक्ट्रिक गाड्या

मुंबईसाठी रिलायन्सच्या १८ इलेक्ट्रिक गाड्या

Published On: Jan 24 2018 1:53AM | Last Updated: Jan 24 2018 1:36AMमुंबई : प्रतिनिधी

पर्यावरणाचे संवर्धन आणि समतोल राखण्याचे आपले वचनपूर्ती करण्याच्या दिशेने रिलायन्स एनर्जीने एक पाऊल पुढे टाकत मुंबई शहरासाठी विजेवर चालणार्‍या 18 इलेक्ट्रिक गाड्या खरेदी केल्या आहेत. यामध्ये सहा चार चाकी आणि बारा दुचाकी अशा एकूण 18 इलेक्ट्रिक गाड्यांचा समावेश आहे. 

रिलायन्स एनर्जी कंपनीला मुंबई शहराच्या आसपास 400 किलोमीटर पर्यंतचा परवाना मिळाला आहे. या संपूर्ण परिसराचे पाच विभाग तयार करण्यात येणार असून प्रत्येक विभागात कमीत कमी तीन इलेक्ट्रिक चार्जिंग स्थानके उभारण्याचा त्यांचा विचार आहे. सध्या अशी सुमारे 15 चार्जिंग स्थानके उभारण्यात येणार असून पुढील तीन वर्षाच्या काळात अजूनही अशी चार्जिंग स्थानके उभारण्यात येणार आहेत. येणार्‍या पुढील तेरा वर्षाच्या काळात सर्व प्रवासी वाहने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रुपांतरित करण्याचा भारत सरकारचा विचार आहे. या दृष्टीने पावले उचलण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून प्रत्येक वाहनामागे एक लाख रुपये अनुदान देण्याचा सरकार विचार करत आहे. सरकारी कामासाठी वापरण्यात येणार्‍या पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांऐवजी इलेक्ट्रिक गाड्या वापरण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून एनर्जी इफीशिएन्सी सर्व्हिस लिमिडेडने (ईईएसएल) दहा हजार बॅटरी खरेदी केल्या आहेत.  

पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहने ही पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत कमी खर्चात अधिक अंतर पार करू शकणार आहेत. शहरात एकदा वाहन चार्जिंग केले की ते 120 किलोमीटरपर्यंत चालणार आहे. सध्या आम्ही स्मार्ट स्लो आणि जलद चार्जिंग स्टेशन रिलायन्स एनर्जीच्या विविध केंद्रावर उभारणार आहोत, असे रिलायन्स एनर्जीने स्पष्ट केले आहे.