Tue, Apr 23, 2019 23:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केडीएमसीकडे रिलायन्सची कोट्यवधींची थकबाकी; मनसेचा खुलासा

केडीएमसीकडे रिलायन्सची कोट्यवधींची थकबाकी; मनसेचा खुलासा

Published On: Dec 28 2017 5:46PM | Last Updated: Dec 28 2017 5:46PM

बुकमार्क करा
डोंबिवली : वार्ताहर 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या तिजोरीचा आधीच खडखडाट झाला आहे. त्यात रिलायन्स कंपनीने भर टाकली आहे. प्रसिद्ध उद्योग समूहाच्या या मोबाईल सेवा सर्व्हिस कंपनीने तब्बल 16 कोटी रुपयांचे कर थकवल्याची बाब उघडकीस आली आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स टेलिकॉम् सर्व्हिस तसेच मुकेश अंबानी यांच्या जियो टेलिकॉमने महानगरपालिका क्षेत्रात उभारलेल्या मोबाईल टॉवरच्या कराची रक्कम थकीत ठेवली आहे. या प्रकरणाची माहिती मनसेचे प्रदेश नेते राजेश कदम यांनी आकडेवारीत उघडकीस आणली आहे. या संदर्भात सोशल मीडियात माहिती प्रसारित करण्यात आली आहे.

दोन्ही अंबानी बंधुंनी केडीएमसीचे तब्बल 16 कोटी रुपये थकविले आहे. मुकेश अंबानीच्या रिलायन्स जीओने 8 कोटी, तसेच अनिल अंबानीच्या रिलायन्स टेलिकॉमने 8 कोटी, अशी तब्बल 16 कोटी येवढी मोठी रक्कम कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची थकवल्याचे मनसे नेते राजेश कदम यांनी उघडकीस आणली. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर ही माहिती प्रसारीत केल्यानंतर पालिका वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

अनिल अंबानीच्या कंपणीने टेलिफोन मोबाईल टॉवरची थकीत मालमत्ता कर रुपये 8 कोटी न भरल्याममुळे महापालिकेने रिलायन्स टॉवर जप्त करून ते लिलावात काढले. तर मुकेश अंबानींच्या रिलायन्स जीओ या कंपनीने पालिका हद्दित फायबर ऑप्टीक्स केबल टाकण्यासाठी अनधिकृतपणे रस्ते खोदले. याबद्दल दोन वर्षांपूर्वी 14.50 कोटी रूपये दंड आकारला. त्यापैकी 6.50 कोटी रुपये दंडाची रक्कम पालिकेने वसूल केली. परंतू उरलेली 8 कोटीची रक्कम भरण्यास कंपनी टाळाटाळ करत आहे. या पालिकेचे काही वरिष्ठ अधिकारी जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अश्या भ्रष्ट पालिका अधिकाऱ्यांमुळेच केडीएमसीचे आर्थिक दिवाळे निघाले असल्याचा आरोप कदम यांनी सोशल मीडियावर करून एकच खळबळ उडवून दिली आहे. विशेष म्हणजे सदर दंड वसूलीबाबत व त्याच्या थर्ड पार्टी ऑडिट अहवालापासुन या अधिकाऱ्यांनी पालिकेचे नवनियुक्त आयुक्त व नगरसेवकांना अनभिज्ञ का ठेवले जात आहे, याचे कोडे मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या गुलदस्त्यात आहे. एकाच कुटुंबाकडून थकवलेले 16 कोटी, धनदांडग्या बिल्डरांना अमाप सवलती, अधिकारी वर्गाला अनधिकृत बांधकामातून मिळणारा अमाप पैसा या भ्रष्टाचारातून सुविधांकडे लक्ष द्यायला पालिकेकडे वेळ आहे कुठे ? त्यात राज्य सरकारचा केडीएमसीकडे जाणीवपूर्व केलेला कानाडोळा अश्या दुर्लक्षामुळे लवकरच कल्याण-डोंबिवली महापालिकेला कुलुप (टाळे) लागणार यात तिळमात्र शंका नसल्याची प्रतिक्रिया असलेली पोस्ट कदम यांनी व्हायरल केली आहे.