Wed, Jul 24, 2019 08:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कर्डीलेंच्या हकालपट्टीस नकार 

कर्डीलेंच्या हकालपट्टीस नकार 

Published On: Apr 11 2018 1:41AM | Last Updated: Apr 11 2018 1:14AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

अहमदनगरमध्ये शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर आणि शिवसैनिक वसंत ठुबे यांच्या हत्याकांडाप्रकरणी अटक करण्यात आलेले राहुरीचे आमदार शिवाजी कर्डीले यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला आहे. शिवसेना नेते पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कर्डीले यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ती फेटाळून लावली. सदर प्रकरणात शिवसैनिकांवर जर चुकीचे गुन्हे दाखल झाले असतील तर ते मागे घेण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखविली. 

संजय कोतकर आणि वसंत ठुबे हत्याकांडाप्रकरणी शिवाजी कर्डीले आणि आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली आहे. या हत्याकांडानंतर शिवसेनेत प्रचंड संताप निर्माण झाला असून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी रामदास कदम आणि दिवाकर रावते यांना अहमदनगरमध्ये पाठविले होते. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी दोघांनीही शिवसेना मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 

शिवसैनिकांच्या हत्याकांडात शिवाजी कर्डीले यांचा हात असून त्यांची भाजपमधून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मात्र, त्यांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी शिवसेना मंत्र्यांना दिले. 

त्याबाबत बोलताना रामदास कदम म्हणाले, आमदार शिवाजी कर्डीले यांची भाजपातून हकालपट्टी होणार नाही. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कोणतेही आश्‍वासन दिले नाही. मात्र, या प्रकरणात शिवसैनिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आश्‍वासन दिले आहे. 

Tags : mumbai, mumbai news, Kardile, Rejecting, expulsion,